शिवसेनेने दाखवला ‘दशावतार’; शो हाऊसफुल्ल

कोकणातील ज्वलंत विषयाची जाण करून देणाऱया ‘दशावतार’ या सिनेमाचे विनामूल्य आयोजन शिवसेनेच्या वतीने माटुंगा येथील मुव्ही टाईम सिनेमागृहात आज करण्यात आले होते. नागरिकांनी हाऊसफुल्ल गर्दी करून या सिनेमाला उत्स्फूर्त दाद दिली.

‘दशावतार’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवरही तो तुफान लोकप्रियता मिळवत आहे. शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांनी शाखा क्रमांक 192 च्या क्षेत्रातील नागरिकांसाठी या सिनेमाचा विनामूल्य शो आज आयोजित केला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते व खासदार अनिल देसाई, उपनेते मिलिंद वैद्य, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत आदी उपस्थित होते.

मुख्य भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाबरोबरच चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर, सुजय हांडे, ओमकार काटे आणि टीमचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले. सिनेमातील कलाकार सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शनी इंदलकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करणारी ठरली. शिवसेनेचे प्रवीण महाले, माहीम निरीक्षक यशवंत विचले, शाखाप्रमुख प्रवीण नरे, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, युवासेना शाखा अधिकारी सुशांत गोजारे, कक्ष वॉर्ड संघटक शेखर यादव, चंद्रकांत झगडे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

‘दशावतार’ पाहून अक्षरशः हललो  

‘दशावतार’ हा सिनेमा पाहून आपण अक्षरशः हललो, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिली. ‘दशावतार’ हा आपल्या मातीशी जोडलेला सिनेमा आहे. सिनेमात जे दाखवलेय ते खरोखर आपल्या अवतीभवती होतेय असेच सिनेमा पाहताना जाणवते. एक सिनेमा म्हणून तो अफलातून आहे. कलाकारांनीही जे काम केलेय त्याला शब्दच नाहीत, असे प्रशंसोद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले. ‘दशावतार’ चित्रपट पाहून आपल्या आजूबाजूला पहा, पेटून उठा, आपल्यातली ज्वलंत मशाल, आगच आपल्या महाराष्ट्राला वाचवू शकते, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये केले आहे.