
लातूर येथील स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण सोसायटीमधील प्लॉट परस्पर इतरांना विकल्याप्रकरणी ५ जणांविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती शिवाजी कांबळे रा. लेबर कॉलनी यांनी केलेल्या तक्रारीनुसार तिचे सासरे काशीनाथ गणपत कांबळे हे स्वातंत्र्य सैनिक असल्याने ‘स्वातंत्र्यसैनिक नगर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, लातूर’ येथे त्यांच्या नावे प्लॉट होता. त्यांच्या निधनानंतर शारदाबाई कांबळे यांच्या नावावर हा प्लॉट हस्तांतरीत करण्यात आला. मात्र त्यानंतर शिवाजी काशीनाथ कांबळे यांचे नावे सभासद म्हणून २००५ मध्ये सदरील प्लॉट हस्तांतरीत झाला. त्या ठिकाणी राहण्यासाठीचे पत्र्याचे शेडही बांधले होते. संस्थेचे अध्यक्ष सुभाष निंबाळकर, महादेव शंकर राऊत आणि इतरांनी अनधिकृतपणे प्लॉटमध्ये प्रवेश करून शेडचे कुलूप तोडले. सर्व पत्रे काढून नेले. कल्पना संभाजी कसबे, संभाजी कसबे यांना प्लॉट हस्तांतरीत केल्याचे कागदपत्रे तयार केली गेली. फसवणूक केल्याप्रकरणी सुभाष गणतपराव निंबाळकर, महादेव शंकर राऊत, राहूल गायकवाड, कल्पना संभाजी कसबे आणि संभाजी कसबे या पाच जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

























































