कोल्हापूर मार्केटयार्डमध्ये मालगाडीचा डबा उलटला, सहा मजूर गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये रात्री एक बोगी जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, दुपारी मार्केटयार्ड येथे सिमेंटच्या गोण्या उतरविताना रेल्वे मालगाडीचा एक डबा उलटून सहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सुरेश पांडुरंग साधुगडे (42), सिराज शब्बीर आदल खान (30), पांडू पंडित गेंड (35), सनाउल्ला उल्लामन शेख (41), सादिक शब्बीर शेख (45), मुजाहिदीन इम्तियाज मुजावर (45, सर्व रा. विक्रमनगर, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.

रेल्वे स्टेशनवरील सर्व्हिसिंग वर्कशॉप येथे रेल्वेच्या एका डब्याला रात्री 11च्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाचे तीन बंब, तसेच जीवनरक्षक आपत्कालीन सेवा संस्थेच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागली कशी, याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच, मार्केटयार्ड येथे रेल्वे मालगाडीचा एक डबा उलटला. त्याखाली मजूर अडकल्याने मोठी खळबळ उडाली. सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या बोगीतून सिमेंट पोती उतरून घेत असताना अचानक उजव्या बाजूला सिमेंट पोत्यांसह ही बोगी उलटली. बोगीखाली अडकलेल्या कामगारांना युद्धपातळीवर बाहेर काढण्यात आले असून, तातडीने उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस यंत्रणा तत्काळ दाखल झाली.