आता मी वकील होणार; इंग्लंडच्या 29 वर्षीय वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

इंग्लंडच्या महिला संघाची वेगवान गोलंदाज फ्रेया डेव्हिसने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. वकील होण्यासाठी फ्रेयाने हा निर्णय घेतला असून ती आता आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) सोशल मीडियावर पोस्ट करत फ्रेयाच्या निवृत्तीची माहिती दिली आणि तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

फ्रेया डेव्हिसने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला वयाच्या 14 व्या वर्षी सुरुवात केली होती. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक संघांच प्रतिनिधीत्व करत आपल्या खेळाची छाप पाडली. तसेच 2023 साली काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सक्सेस क्रिकेट क्लबला विजेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडली. त्याच्या खेळाचा आलेख सतत उंचावत गेला आणि 2019 साली फ्रेयाने Women’s Cricket Super League मध्ये 19 विकेट घेत सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार पटकावला. 2019 सालीच इंग्लंड संघासाठी फ्रेयाने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्री गणेशा केला. 2019 ते 2023 या काळात तिने इंग्लंडकडून वनडे आणी टी-20 मिळून 35 सामने खेळले आणि एकूण 33 विकेट घेतल्या. क्रिकेटबरोबर एका बाजूने तिचा अभ्यास सुद्धा सुरू होता. तिने Legal Practice Course (LPC) आणि LLM चा अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केला आहे. आता क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकून ती वकील होण्यासाठी सज्ज झाली आहे.