लेखकाच्या घरात……सैनिकहो तुमच्यासाठी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

ज्येष्ठ लेखिका अनुराधा गोरे. शहीद मुलाच्या अंगोपांग रुजलेली देशभक्ती एक आई आपल्या लेखणीतून, भाषणातून समाजापर्यंत नेत आहे.

मी खूप नशीबवान आहे. देवाची लाडकी आहे. मला सगळी चांगलीच माणसं भेटत गेली. प्रत्येकाकडून मी खूप काही शिकले.’’ ही विचारसरणी असणाऱया अनुराधाताईंना भेटले, तेव्हा दिसलं ते एखाद्या लहान मुलासारखं त्यांचं हसणं, निळ्या डोळ्यांच्या आरस्पानी दृष्टीनं जगाकडे बघणं’’ अनुराधाताई सांगत होत्या, ‘‘26 सप्टेंबर 1995 ला विनूला (कॅप्टन विनायक गोरे) जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिह्यात वीरगती प्राप्त झाली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. त्याआधी प्रत्येक घरात असतं तसं साधंसरळ जगत होते मीही. माझं माहेर सातारा. स्वतःचा वाडा, देऊळ. पूर्वी घरात बसूनही सहा-सात धबधबे कोसळताना दिसायचे. यवतेश्वराचं देऊळ, डोंगर, अजिंक्यतारा, जरांडय़ाचा डोंगर आजूबाजूला. घरातच देऊळ. त्यामुळे परवचा, स्तोत्रं, आरती आपोआपच म्हटली जायची. माझे वडील आमच्या आळीतले पहिले ग्रॅज्युएट. आजोबा दशग्रंथी ब्राह्मण. गाण्याची त्यांना आवड. पहिला रेडिओ आमच्याकडे आला, तेव्हा रेडिओ असतो कसा हे बघायला माणसं आली होती. सर्वांगीण विकासावर भर देणारं शिक्षण. आताच्या इंटरनॅशनल स्कूलला लाजवील असे उपक्रम तिथे होते. शास्त्रोक्त संगीत, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, तलवारीचे, जांबियाचे हात, लेझीम… सगळं तिथेच शिकले. सेल्फ डिफेन्सबद्दल आता बोललं जातं, जो मी तेव्हाच शिकले. ओपन लायब्ररी होती तिथे. त्यामुळे पुस्तकं दिसायची आणि वाचली जायची.’’

विषय समजावून सांगण्याची हातोटी इतकी छान की, त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. लग्न लवकर झाल्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं होतं, ते लग्नानंतर पूर्ण केलं त्यांनी सिडनेहॅम कॉलेजमध्ये. स्वयंपाक येत नव्हता फारसा म्हणून सासऱयांच्या सूचनेनुसार केटरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा केला. शिक्षणही झालं आणि स्वयंपाकाचे धडेही मिळाले. पार्ले टिळक विद्यालयात शिक्षिका म्हणून आणि नंतर पोद्दार विद्यालयात प्राचार्या म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवले. अनुराधाताईंनी हे ठळकपणे सांगितलं की, ‘‘त्यावेळी ‘कुठे नोकरी मिळत नाही म्हणून शिक्षक झालो’ असे शिक्षक नव्हते.

ज्याच्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं असं अनुराधाताई म्हणाल्या होत्या, त्या कॅप्टन विनायक गोरेच्या, म्हणजेच त्यांच्या विनूच्या लष्करात जाण्याची इच्छेबद्दल, त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल त्या भरभरून बोलत होत्या. ‘‘शिवाजी पार्कला राहत होतो आम्ही. घरासमोर बालमोहन. त्यांची एनसीसी परेड दारावरून जायची तेव्हा त्याचा आवाज ऐकून विनू गॅलरीत धावायचा. मग घरात शिट्टी वाजवून ‘लेफ्ट-राईट’ सुरू व्हायचं त्याचं. शिवाजी पार्कवर होणाऱया भाषणांमधले शब्द, त्याचे अर्थ त्याला कळले नाहीत तरी त्यांच्यासारखं टेबलावर उभं राहून, हातवारे करत भाषणाची ऑक्टिंग करायचा तो. शाळेत जाण्यापूर्वी व्यायामशाळेची गट्टी झाली त्याची. इतके मार्क मिळव, एवढा अभ्यास कर, अमुक नंबर हवा असा आमचा आग्रह नसल्यामुळे हुशार मुलांच्या तुकडीत असूनही इतर गोष्टी तो करू शकला. माझ्या माहेरी पूर्वजांची एक तलवार होती. ती माळ्यावरून काढून त्याच्या वरचे शब्द वाचायचा तो नेहमीच प्रयत्न करायचा. सहावीत असताना स्वतःच्या खाऊच्या पैशांतून त्यानं ब. मो. पुरंदरे यांचं ‘शिवचरित्र’ विकत आणून इतक्या वेळा वाचलं होतं की, ते त्याला जवळ जवळ मुखोद्गत झालं होतं. शिवाजी, मावळे अशा सातारला मिळणाऱया मातीच्या खेळण्यांशी तो मनसोक्त खेळायचा. लहानपणापासूनच त्याला सैन्यात जायचं होतं. दहावी पास झाल्यावर एअरगन हवी असा हट्ट धरला होता त्यानं. सी.ए. सोडून सी.डी.एस. परीक्षेचा एकलव्यासारखा अभ्यास करून तो स्वबळावर सैन्यात दाखल झाला.

साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात त्यानं खूप काही अनुभवलं. म्हणायचा, वास्तव आणि वृत्तपत्रातून समोर येणारं कश्मीर यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. 25व्या वाढदिवशी पत्र लिहिलं होतं त्यानं. ‘आता रात्री बारा वाजता मी प्रतिज्ञा करतो की, यापुढचा माझा प्रत्येक श्वास, रक्ताचा प्रत्येक थेंब केवळ माझ्या मातृभूमीसाठी असेल. हे करताना तुमचा मुलगा म्हणून जर माझं कर्तव्य मी पार पाडू शकलो नाही, तर मला क्षमा करा’ आणि खरंच पुढचा वाढदिवस येण्यापूर्वीच देवाला लाडका झाला तो. तो गेल्यावर मी अंतर्मुख झाले. आयुष्याकडे बघण्याचा, जगण्याचा दृष्टिकोन आणखी व्यापक झाला माझा.

विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात मला वक्ता म्हणून बोलावलं होतं. मी कधीच भाषणं दिली नव्हती तोपर्यंत. भाषणात मी म्हणाले, ‘आर्मी ऑफिसरच्या अकरा हजार जागा रिकाम्या आहेत. तुमच्यासारख्या युवकांनी त्या भरायला हव्यात.’ खूप भारावून ऐकत होते सगळे माझं बोलणं. दोन दिवसांनी माझ्या वडिलांच्या वयाचे गृहस्थ मला भेटून म्हणाले, ‘तुमचं भाषण तलवारीसारखं धारदार, बंदुकीच्या गोळीसारखं आरपार आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आणि स्वातंत्र्यानंतर ते राखण्यासाठी जे झगडले, त्यांचं प्रतिनिधित्व करणारी ही भाषणं तुम्ही देत रहा.’ मग मी निश्चय केला, विनूला दिलेलं वचन पाळायचा… घराबाहेर पडल्यावर डोळ्यांत पाणी न आणता कॅप्टनच्या आईसारखं काम करायचा… किमान शंभर शाळा आणि संस्थांमध्ये तरुणांना सैन्यात जाण्याबद्दल मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचा… आता ही शंभरी कधीच पार पडली आहे.’’

बाल दरबार, वनिता मंडळ, शैक्षणिक कार्यक्रम यासाठी अनुराधाताईंनी सातत्यानं लिहिलं. अविनाश धर्माधिकारींच्या ‘चाणक्य मंडळा’शी त्या संलग्न झाल्या. ‘युवा सकाळ’नं त्यांना लिहायला सांगितलं. त्याच लेखमालेचं ‘कळी उमलताना’ हे पुस्तक झालं. सगळ्या सत्यकथा. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मधलं टेबल बाजूला झालं की, शिक्षक विद्यार्थ्यांच्या जवळ येतात. नाहीतर फक्त अभ्यासापुरता विद्यार्थी कळतो शिक्षकांना असं त्यांना वाटतं. ‘प्रकाशाचे बेट’ ही त्यांची पहिली कथा त्यांच्याच एका विद्यार्थ्याची. त्याचं सतत अनुपस्थित राहणं, सावत्र वडिलांचा त्रास आणि मग शाळा सोडून जाणं याबद्दल आपण काहीही करू शकलो नाही याबद्दलची खंत हा त्या गोष्टीचा विषय. यशवंतराव चव्हाण विद्यापीठासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक व्हिडीओ बनवले.  शहीद जवानांची प्रातिनिधिक आई बनून त्यांनी आपल्या विचारांना लेखणीतून उतरवलं. ‘आचंद्रसूर्य नांदो’, ‘गाऊ त्यांना आरती’, ‘1971चा रणसंग्राम’, ‘ओळख सियाचेनची’ याबरोबरच ‘परीक्षेची भीती कशाला’, ‘जॅक ऑफ ऑल’ अशी 14 पुस्तकं त्यांनी आतापर्यंत लिहिली आहेत. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’, ‘ही अपंग सोल्जर्सची यशोगाथा’ पुस्तकरूपात 26 सप्टेंबर 2018 रोजी उत्कर्ष मंडळात प्रकाशित झाली.

हिरकणी, ‘झी’ जीवन गौरव, महाराष्ट्राची वीरमाता असे अनेक पुरस्कार लाभलेल्या अनुराधाताई सध्या एकटय़ाच पार्ल्यातल्या घरी राहतात, पण त्यांचा परिवार मात्र देशभर आहे. कारण पूर्ण हिंदुस्थान हेच त्यांचं घर आहे. करावंसं वाटतं ना देशासाठी काहीतरी, तर सैनिक कल्याण निधीला आपण मदत देऊ शकतो. काम कुठलंही असो, ते प्रामाणिकपणे करणं म्हणजेही देशसेवाच. स्वच्छता, सामाजिक भान, शिस्त पाळणं म्हणजेही देशसेवा. सगळ्यांबद्दल प्रेम, आपुलकी, आदर म्हणजेही देशसेवाच. शेतकरी, सैनिक, लोकसेवा करणारा प्रत्येक जण यांच्याबद्दल कृतार्थ भावना ठेवणं, त्यांच्या आयुष्याला समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्यस्थळाला निदान एकदा भेट देणं यामुळे ‘‘मी काय करू शकतो?’’ या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळेल. कारण या सर्वांनाच हवं असतं प्रेमाने बोलणारं कुणीतरी. त्यांना हवा असतो आपुलकीचा हात पाठीवर. द्यायचा असतो आपणच त्यांना विश्वास की, जेव्हा तुम्ही आमचं आणि आमच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असता तेव्हा आम्हीही करत असतो तुमचं आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काहीतरी…