
अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]
सविता दामले… अनेक इंग्लिश पुस्तकांचे स्वैर अनुवाद… मराठी भाषेवर प्रभुत्व… प्रतिकूलतेवर शांतपणे मात करण्याची त्यांची हातोटी त्यांच्या लिखाणात जाणवते….
आजोबा म्हणाले म्हणून आर्टस्ला न जाता तू कॉमर्सला गेलीस.. बाबांना बिझनेस करायचा होता, म्हणून घर चालवण्यासाठी तू बँकेत नोकरी केलीस. पण आता? आता तुला कोण अडवतंय लिखाणापासून?’ धाकटय़ा मुलानं हा प्रश्न विचारला आणि सविताताईंनी बँकेची नोकरी सोडली. आता फक्त लिखाणासाठी त्या पूर्ण वेळ देत आहेत. ‘जेरुसलेम’, ‘सोनिया गांधी’, ‘गुलजारांच्या पटकथा’, ‘मनगंगेच्या काठावर’, ‘तुटलेले पंख’, ‘नेहरूंची सावली’ अशा गाजलेल्या पुस्तकांच्या अनुवादिका सविता दामले यांच्या घरी त्यांच्या वातानुकूलित खोलीत प्रवेश करताना मला जाणवला तो कापराचा प्रसन्न करणारा सुगंध. जो एका दिव्यावर ठेवलेल्या छोटय़ाशा पट्टीवरच्या कापराचा होता. आग्रहानं खाऊ घातलेल्या पोह्यांसह आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि प्रकर्षानं जाणवत राहिलं की, मी एका अत्यंत साध्या, प्रामाणिक, आनंदी अशा व्यक्तीशी बोलते आहे. तिच्या या गुणांनीच तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवलं आहे. नाहीतर नेमकं जे करायचं होतं तेच करण्यापासून आयुष्यानं त्यांना सतत दूर ठेवलं होतं.
त्या सांगत होत्या, ‘गिरगावात ताराबाग चाळीत जन्म झाला माझा. त्यावेळी मुंबईत फ्लॅट सिस्टिम नव्हतीच. माझ्या घरी जातपात पाळण्याचे संस्कार नव्हते. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत तिथे होते. ब्राह्मण सभेच्या संगीत नाटकाच्या तालमी बघायला रोज रात्री वडिलांबरोबर जायचा हट्ट धरायचे मी. तिथले संवाद, गाणी, पाठ झाली होती माझी. शेजारचे राव आजोबा खूप गोष्टी सांगायचे. कल्पनाशक्तीला चालना मिळायची त्यामुळे. वयाच्या आठव्या वर्षी कविता केली होती मी. महागाईवर. एक बाहुली मला खूप आवडली होती, पण ती खूप महाग होती. म्हणून ती न घेण्याबद्दल वडिलांनी मला समजावलं होतं. म्हणून त्या कवितेत शेवटी मी लिहिलं होतं, ‘मला वाटते दिल्लीला जावे, इंदिराजींना सांगावे, मालाचे भाव तुम्ही स्वस्त करावे’. मी प्रचंड हसले. हो, कारण ‘आमच्या काळी केवढी स्वस्ताई होती!!’ या पालुपदापेक्षा, तेव्हाही महागाई होती ही वस्तुस्थिती सांगणारं कुणीतरी भेटलं म्हणून… आणि ती महागाई सत्ताधारीच दूर करतील हा भाबडा विश्वास आत्तासारखाच तेव्हाही होता म्हणूनही.
असो. सविताताई म्हणाल्या, ‘आई एलआयसीत. वडील क्लास वन ऑफिसर गव्हर्नमेंटमध्ये. एलआयसीचं लोन घेऊन आम्ही घर घेतलं. अंधेरीला राहायला आलो. मी खूप अस्वस्थ झाले. अंधेरीला गिरगावसारखा सांस्कृतिक वारसा नव्हता. पण शेवटी माणूस परिस्थितीला स्वीकारून आपली आवड जपायचा प्रयत्न करतोच. माझंही तेच झालं. खूप वाचन करत राहिले. शाळेत गणितात मिळतात तसे मार्क मला भाषेत मिळायचे. बोर्डात 48वी आणि शाळेत पहिली आले होते मी. सायन्स आवडत नाही, मग निदान कॉमर्सला तरी जा असं वडील म्हणाले, म्हणून माझ्या आवडीला मुरड घालून मी कॉमर्सला गेले. बुद्धी आणि पाठांतराच्या जोरावर बी.कॉम.ला प्रथम वर्गही मिळाला मला. एकंदरीत मध्यमवर्गीय आई-वडिलांचा विचार साधा, सोपा आणि सरळ होता. शिक्षण, बँकेत नोकरी, चांगलं स्थळ आणि सुरळीत आयुष्य. मला काय हवं याचा विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. बंडखोरी स्वभावातच नव्हती माझ्या. पदवी मिळाल्यावर लगेच लग्न झालं. यजमान नोकरी करत होते, पण त्यांना बिझनेस करायचा होता. मग मला नोकरी न करण्याची चैन करणं शक्यच नव्हतं. संसाराचा गाडा सुरळीत चालावा म्हणून मी स्टेट बँकेत नोकरी केली. घर घेण्यापासून सगळंच करायचं होतं. मला वाटलं करीअरपेक्षा नवऱयाचं करीअर होऊ दे. मुलं झाली. संसाराचं चक्र सुरू झालं आणि त्यातच अडकून गेले.’
सविताताई जे सांगत होत्या ती तर घराघरातली स्थिती आहे. मुलांबद्दल निर्णय घेताना त्यांचं मत विचारातच घेतलं जात नाही. तेवढा संवादच नसतो, म्हणून तर मुलांना नंतर निराशावाद ग्रासतो. अर्थात तीव्र आंतरिक इच्छा परिस्थितीवर मात करते आणि आपल्या आयुष्याला तीच ध्येयाप्रत घेऊन जाते हेही तितकंच सत्य आहे, जे सविताताईंच्या बाबतीतही घडलं. त्या म्हणाल्या, ‘जर्मन क्लासेसबद्दल मला कळलं. मला भाषेची आवड, म्हणून ऑफिस सुटल्यावर त्या क्लासला जायला लागले. अविनाश बिनीवाले तिथे शिकवायचे. अभ्यासक्रमातले अनुवाद बोलता बोलता मी व्यक्त केलेली माझी लेखनाची आवड, त्यांना दाखवलेल्या माझ्या कविता यामुळेच त्यांनी मला सुचवलं की, राज्य मराठी विकास संस्थेची वर्तमानपत्रात जाहिरात आली आहे. नोबेल प्राईज विनर लेखकांच्या पुस्तकांचा अनुवाद त्यांना करून हवा आहे. मी त्या संस्थेत फोन केला. वसंत आबाजी डहाके आणि कविता महाजन यांच्या देखरेखीखाली हे काम होणार होतं. टिळक मंदिरात जाऊन पुस्तक आणलं. पर्ल बर्गचं. तेव्हा संगणक नव्हता. पहिली 20 पानं लिहून दिली. ती आवडल्यावर 400 पानी अनुवाद हातांनी लिहून नंतर टाईप करून दिला. ऑफिस, संसार सांभाळून कधी पहाटे उठून, कधी रात्री जागून हे काम केलं. पण ती सरकारी संस्था. नंतर त्यांनी प्रोजेक्ट गुंडाळून ठेवलं. कळलं तेव्हा वाईट वाटलं. एवढी मेहनत वाया कशी घालवायची म्हणून प्रकाशक शोधायचा प्रयत्न केला. अनेक नकार पचवले. शेवटी पुष्प प्रकाशननं पुस्तक प्रकाशित केलं.’
आपली लिखाणाची इच्छा आणि सक्षमता सविताताईंनी प्रामाणिक प्रयत्नांतून सिद्ध केली आणि नवी नवी अनुवादाची कामं त्यांच्याकडे येत गेली. अनुवाद करताना खूप बारकाईने वाचावं लागतं, संदर्भ शोधावे लागतात, त्यामुळं आपणही आतून समृद्ध होतो असं त्यांना वाटतं. त्या म्हणाल्या, ‘मुळात अनुवाद हा उत्कृष्ट कलाकृतीचा होतो, त्यात तो परदेशी कृतीचा असला तर त्या संस्कृतीबद्दलही खूप नवनवी माहिती कळते. शेवटी कुठलीही भाषा माणसंच तर बोलत असतात. त्यामुळे अनुवाद करताना ती माणसं आणि त्यांची संस्कृती आपल्या भाषेत आणताना खूप आनंद मिळतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तर नक्कीच बदलला आहे माझा. वाढत्या वयानुसार आणि स्वतःच्या जीवनात आलेल्या अनुभवांनी तो बदलतोच, पण या परकायाप्रवेश करून अनुभवलेल्या लेखनातूनही तो बदलला. अनुवाद करताना जेरुसलेमची तीन हजार वर्षांची चरित्रकथा अनुभवायला मिळाली. त्या त्या काळातील महत्त्वाचे राजे, तत्कालीन परिस्थिती, सामान्य प्रजा याविषयी वाचून वाटलं की, माणूस काहीच बदलला नाहीये. पूर्वी तो जेवढा क्रूर होता तेवढाच तो आजही आहे. आता उलट तंत्रज्ञान त्याच्या हाताशी आलं असल्यामुळे तो ते वाईट मार्गानंच वापरत चालला आहे.
सविताताईंचे यजमान कॅन्सरनं गेले त्यावेळी मुलांची शिक्षण अर्धवट होती म्हणून त्यांनी नोकरी चालू ठेवली. दोन्ही मुले सी.ए. झाली आणि मग धाकटय़ा मुलानं विचारलेल्या प्रश्नानं त्यांना जागं केलं. दुसऱयांसाठी जगत असताना स्वतःसाठी जगायला बळ मिळालं. म्हणूनच बँकेची नोकरी सोडताना झालेल्या आर्थिक नुकसानीपेक्षा मनासारखं जगता न आल्याची खंत अधिक हानिकारक आहे या विचारानं नोकरी सोडून पूर्णवेळ लिखाणासाठी दिला आहे आता त्यांनी. पुस्तकाच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता अनेक भावानुवाद करतानाच ‘रतन टाटा’, ‘शर्मिला इरोम’, ‘माझे गाणे माझे जगणे’ ही स्वतंत्र पुस्तकंही नावावर आहेत आता त्यांच्या. आमच्या गप्पा सुरू असतानाच त्यांची सून तिथे आली. ठाण्याला फ्रेंच, स्पॅनिश, जर्मनीची अकादमी आहे तिची. मुलानं सी.ए. झाल्यावर नोकरी सोडून जर्मन शिकवायचं ठरवलं आणि सविताताईंनी त्याला होकार दिला. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं तेव्हा मुलांचं आयुष्य त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार, त्यांनी आपल्या घरात जपल्याची जाणीव मला सुखावून गेली.























































