लेखकाच्या घरात…सुखाचा समाधानाचा तेवतोय नंदादीप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]

उमा कुलकर्णी… एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथांसारखे प्रथितयश कन्नड लेखक मराठी वाचकाला सहज आपलेसे वाटतात ते उमाताईंच्या ओघवत्या लेखणीमुळे….

संवादू अनुवादू’, ‘केतकर वहिनी’ अशा स्वतंत्र पुस्तकांबरोबरच ‘पर्व’, ‘वंशवृक्ष’, ‘परीघ’, ‘डॉलर बहू’, ‘महाश्वेता’, ‘टिपू सुलतानचं स्वप्न’, ‘नाग मंडल’ अशा 56 पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणाऱया साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारांच्या मानकरी उमा कुलकर्णी यांच्याशी बोलताना किंचित दडपण होतं खरं, पण उमाताईंचा आश्वासक सूर ऐकला आणि दीड तास गप्पांमध्ये कसा गेला ते कळलंच नाही. त्या मूळच्या बेळगावच्या. ठळकवाडी परिसरात त्यांचं माहेर. आमचं भाडय़ाचं घर. बेळगाव हे मिलिटरी ठाणं. बदली होऊन आलेले मिलिटरीतले अनेक अधिकारी तिथे भाडय़ानं राहायचे. त्यामुळे शेजार विविध भाषिकांचा. सगळ्यांचेच सगळे सण उत्साहानं साजरे व्हायचे. दिवाळीही. रांगोळीची तयारी करायचो, आकाश कंदिलाची हौस होती आम्हाला, पण नेमका पाऊस यायचा आणि मग हिरमोड व्हायचा. आम्ही सात भावंडं. आई सगळा खटाटोप करायची फराळाचा. चिरोटे, करंज्या करायला आम्हीसुद्धा मदत करायचो. गावाकडे शेती होती. वडील त्यावर बेळगावी राहूनच देखरेख करायचे. वार्षिक उत्पन्न यायचं, त्यामुळे कपडय़ांची खरेदी वर्षातून एकदा व्हायची. त्यातलाच एखादा दिवाळीसाठी बाजूला ठेवला जायचा. दिवाळी अंक घेण्यासाठी मात्र काही खास पैशांची तरतूद केलेली असायची. शिवाय लायब्ररी होती. पुस्तकं, दिवाळी अंक आवडीनं वाचलेत मी तेव्हा. माझ्या आईच्या वडिलांना गाव नाईक मास्तर म्हणून ओळखायचं. गावातच आजोळ. भाऊबीजेनंतर बहिणींची तीज साजरी व्हायची. अक्कन तदगी म्हणतात त्याला. माझ्या आईला, मावशीला, कुटुंबासहित आजी फराळाला बोलवायची. काम करून दमलेल्या या मुलींना आजी ओवाळायची. चतुर्थीला अम्मन चौथी. म्हणजे घरातल्या सगळ्या केशवपन झालेल्या बायकांना न्हाऊ माखू घालून त्यांचं कौतुक केलं जायचं.’ उमाताई हे सांगत होत्या.

उमाताई 70 साली लग्न होऊन पुण्यात राहायला आल्या. मॉडेल कॉलनीत. शशिप्रभामध्ये. माहेर मराठी. सासर कानडी. लग्न झालं तेव्हा नीट कन्नड येत नव्हतं. त्यामुळे दीड वर्ष सीमाप्रश्न आमच्या घरातही होताच.’ या विधानावर आम्ही दोघीही खूप हसलो.

या सगळ्या प्रयत्नात उमाताईंना साथ मिळाली ती त्यांच्या यजमानांची. अनुवादक किती मोठा आहे? त्याच्या नावावर किती पुस्तकं आहेत? असे तथाकथित मापदंड न लावता लिखाणाचा दर्जा, अनुवाद क्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव यावरून शिवराम कारंथ यांनी परवानगी दिली यातच त्यांचा मोठेपणा आहे. घराविषयीची आपली संकल्पना सांगताना उमाताई म्हणाल्या होत्या, ‘एकाचा बळी देऊन दुसऱयाचा विकास होतो ते घर नसतं. एकमेकांविषयी आदर ठेवणं, समजून घेणं, आस्था दाखवणं, आपल्या शरीराचाच एक अविभाज्य घटक असल्यासारखं कुटुंबातल्या सदस्यांनी एकमेकांशी वागणं, एकमेकांची स्पेस मान्य करणं म्हणजे घर. ज्या घरात कामवाल्या बाईचाही विकास होतो, अर्धा तास घरी कोणी येऊन गेलं तरी त्याला सकारात्मकता मिळते ते खरं घर.’ उमाताईंचं घर सर्वार्थानं असंच परिपूर्ण आहे हे त्यांच्याशी बोलताना वारंवार जाणवत होतं.

‘शशिप्रभा’मधल्या घरात शिवराम कारंथ, भैरप्पा, पुलं, सुनिताताई, अनंत मूर्ती असे अनेकजण राहून गेले. शिवराम कारंथ यांना नेण्यासाठी अनेक हॉटेल मालक गाडी पाठवायचे, पण ते विरुपाक्ष यांना विचारायचे,’ पुलकर्णी तुला मी जड होत असेन तरच जाईन हॉटेलमध्ये.’ खरं तर, त्या घरी ना बेसिन होतं, ना कमोड. त्यांचं वय 90 च्या पुढे. त्यांच्या दृष्टीनं या आवश्यक गोष्टी.. पण ते राहायचे आमच्याकडेच..’

‘शशिप्रभा’मधून त्या नंतर राहायला गेल्या वरणगावला विरुपाक्ष यांच्या बदलीच्या गावी. तोवर त्यांनी आर्ट पेंटिंगमध्ये एम.ए. आणि द्राविडी मंदिरांची स्थापत्यशैली याच्यावर डॉक्टरेट मिळवली होती. वरणगावच्या घरातच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचं कळलं. त्याचवेळी महाराष्ट्र गौरव पुरस्कारदेखील त्यांना जाहीर झाला, जो एक लाख रुपयांचा होता. त्या म्हणाल्या, ‘त्या काळाच्या मानानं ती रक्कम खूप मोठी होती. त्याचा एक फायदा असा झाला की, तुटपुंज्या पेन्शनला या व्याजाचा आधार मिळाला आणि विरुपाक्ष यांनी ऐच्छिक निवृत्ती घेतली. दहा वर्षे नोकरीची शिल्लक असताना.. विजय सुपर स्कुटरवरून दोघांनी वरणगाव ते पुणे असा प्रवास केला.’ गाढवाला कशी आजूबाजूला ओझी बांधतात, तसं स्पूटरला सगळं सामान बांधून आम्ही दोघांनी तो प्रवास केला’ असं त्यांनी अगदी मजेत सांगितलं. ‘शशिप्रभा’च्या जागी पार्प हेरिटेज उभं राहिलं. तिथे वन बीएचके मिळाला आणि अजून एक खोली त्यांनी विकत घेतली.’ आता आमच्याकडे कोणी पाहुणे आले, तर त्यांना आम्ही स्वतंत्र खोली देण्याइतके श्रीमंत झालो आहोत’ असंही त्या हसत हसत म्हणाल्या.

याच खोलीमध्ये माझ्या पेंटिंगचा स्टुडिओ आहे. विरुपाक्ष यांचा संगणकही तिथेच विसावलेला असतो. निवृत्ती घेतल्यानंतर विरुपाक्ष यांनी ब्रेकफास्टची कायमस्वरूपी जबाबदारी स्वेच्छेनं स्वीकारली आहे. इडली जरी करायची असली, तरीही डाळ, तांदूळ भिजत घालणं, वाटणं, चटणी, सांबार सगळं तेच करतात. त्यामुळे सकाळचा फ्रेश वेळ मला पूर्णपणे लिहायला मिळतो. पोळ्यांसाठी आणि वरकामासाठी बाई सोडता बाकीचं काम मीच करते. स्वयंपाकही. बायकांची तक्रार असते की, पुरुषांनी स्वयंपाक केल्यावर पसारा आम्हाला आवरायला लागतो. पण विरुपाक्ष इतकं टापटिपीनं सगळं करतात की मला त्या तक्रारीला जागाच नाही. स्वयंपाकाची ही सवय त्यांना त्यांच्या आईनं लावलेली आहे. किमान पिठलं भात तरी करता आलंच पाहिजे याचा आग्रह तिनं तेव्हा धरला त्याचा हा परिणाम. लिखाणामध्ये माझं पेंटिंग मागे पडलं होतं, तेव्हा प्रभाकर कोलते यांनी वेळोवेळी टोचणी देऊन मला पुन्हा पेंटिंग करायला प्रवृत्त केलं. साध्या कागदावर काढलेली पेंटिंग मी कोलतेंना दाखवली, तेव्हा ते म्हणाले, ‘याला फ्रेम करून घरातल्या भिंतीवर लावा. तुम्हीच तुमच्या पेंटिंगचा आदर केला नाही तर इतर कसे करतील?’

‘अजूनही सकाळी उठून लिहायला मला आवडतं. संध्याकाळी आम्ही दोघं रोज फिरायला जातो. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठवडय़ातून किमान तीन दिवस मी बॅडमिंटन खेळायला जाते. प्रकाशक सांगतो म्हणून मी कुठलंही पुस्तक अनुवादित करत नाही. निर्णय माझा असतो. पर्व पुस्तकाचा अनुवाद मी पाचवेळा लिहून काढला. मला मनाजोगता वाटेपर्यंत. पुस्तक प्रकाशित होईल की नाही याची रिस्क स्वीकारून माझा मी स्वतंत्र निर्णय घेऊन लिहिते. मूळ लेखकाचं लेखन संपूर्णतया माझ्या लिखाणात उतरावं, पण तरीही त्याच्या भाषेचा प्रभाव मराठीकरण करत असताना अनुवादात राहू नये, यासाठी मी प्रयत्न करते.’ आता वयपरत्वे पूर्वीसारखा फराळ करायला आणि खायलाही नाही जमत दिवाळीत. पणत्या मात्र खूप आवडतात लावायला. विकतचा फराळ, साडी, घरातल्या कामवालीला देते मी आठवणीनं. तिचा आनंद बघण्यात मला खूप आनंद होतो ना, म्हणून… लांब लांबच्या नातेवाईकांची मुलं आमच्याकडे हक्काने राहून गेली आणि आमचं दोघांचं कुटुंब विस्तारित होत गेलं.’ हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा वाटलं, या दिवाळीत दोन पणत्या लावूया का आपणही शेजारच्या झोपडीत? आनंदाचे किरण येतील मग, आपल्याही घरात झिरपीत..