
अनुराधा राजाध्यक्ष
अशोक बेंडखळे… निर्मम वृत्तीचे साहित्यिक… कोकणातील छोट्याशा घरापासूनचा खडतर प्रवास पार्ल्यात येऊन स्थिरावला… पण साधेपणा… सहजवृत्ती तीच राहिली…
`पुष्कळा’ दिवाळी अंकासाठी मी कविता दिली होती तेव्हा अशोक बेंडखळे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर एवढ्या वर्षांनी त्यांच्या घरी गेले तेव्हा एक पान उलटून पुढचं पान वाचायला घ्यावं तितक्या सहजतेनं, काळाच्या उलटलेल्या पानांचा हिशेब न ठेवता अशोकदादा भेटले. तसंच पूर्वीसारखं घर. साधं. अगदी माफक आवश्यक फर्निचर असणारं. घरात माणसाचं प्रतिबिंब उमटतं म्हणतात ते उगीच नाही. अंजली वहिनींचा सरळ-साधा मुखवटा नसलेला स्वभावही त्या घराला साजेसाच. रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी पन्हाळघर खेड्यातल्या कौलारू घरापासून मुंबईतल्या घरापर्यंत अशोकदादांनी केलेला घरांचा, 33 पुस्तकांचा, टेलिफोन खात्यातल्या नोकरीचा, ‘अंतरंग हाऊस’ मॅगझीनच्या जबाबदारीचा, मिळालेल्या पुरस्कारांचा प्रवास ऐकताना जाणवत होतं. कुठलंही साहित्यिक वातावरण नसताना केवळ आंतरिक ऊर्मीमुळे येणाऱ्या या अडचणींच्या उरावर पाय देऊन ईप्सित साध्य करणारी जी ध्येयकेंद्रित माणसं असतात त्यातलेच एक आहेत अशोक बेंडखळे.
ते सांगत होते, ‘पन्हाळघरची शाळा कुडाच्या भिंतींची. गुरांच्या शेणानं सारवायला लागायची ती. झाडलोट, सारवणं अशी कामं मुलंच करायची उत्साहानं. तिथे नव्हत्या कुठल्याही आकर्षक सोयी, ना होती स्नेहसंमेलनं, स्पर्धा, बक्षिसं यांची रेलचेल. एकशिक्षकी शाळा ती. आमच्या वर्गात थोडं शिकवून, माझ्यावर पाढे पाठ करून घ्यायची जबाबदारी टाकून दुसऱ्या वर्गात शिकवायला जायचे शिक्षक. पण या सगळ्यातही आनंद वाटायचा. कधीही शाळा चुकवल्याचं आठवत नाही मला. शाळेला सुट्टी पावसाळ्यात. कारण शाळेतल्या शेतकऱ्यांच्या मुलांना पावसाळ्यात पेरणी, लावणीची कामं असायची. गावात क्वचितच कुणाकडे छत्री असायची. बाकी सगळे पानांनी शाकारलेली इरली घेऊन फिरायचे पावसात. नागपंचमी गारुड्यांनी आणलेल्या जिवंत सापाला दूध देऊन, राखीपौर्णिमा नदीला नारळ अर्पून, गोकुळाष्टमी दहीहंडी फोडून साजरी करायचो आम्ही. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीचं पात्र उन्हाळ्यात आटायचं. कोरड्या विहिरीत पाणी कमी झालं की डोंगराच्या पायथ्याशी छोटी छोटी डबकी खणून पाणी आणावं लागायचं. दोन-तीन मैलांचं अंतर केवळ पाण्यासाठी तुडवावं लागायचं मुलीबाळींना. मे महिन्यात गवतानं शाकारलेल्या कुणब्यांच्या घरांना हमखास आग लागायची. ते क्षणार्धात भक्षस्थानी पडलेले संसार, पुरुषांचा आरडाओरडा, बायकांचं ऊर बडवणं आजही आठवतं. पण पाण्याअभावी तो संहार टाळण्यासाठी कोणीच काहीच करू शकायचं नाही. एकदा हा आगीचा डोंब आमच्या घरापर्यंत पोहचला होता. घर विटांचं होतं म्हणूनच वाचलं केवळ.’
अन्न, वस्त्र, निवारा या जगण्यासाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या या गोष्टींचा अभाव असताना आणि त्या मिळवण्यासाठीच आयुष्य खर्च होताना वस्तुस्थितीला स्वीकारलं तरी तिला शरण न जाता वरचढ होण्यासाठी काहीजण प्रयत्नशील असतात. त्यातलीच एक होती अशोकदादांची आई. आपल्या मुलांचं भविष्य शिक्षणात आहे ही दूरदृष्टी असल्यामुळे संकटांचं वर्तुळ छेदून बाहेर पडायला हवं हे तिनं ओळखलं होतं. पोस्टामध्ये नोकरी करणाऱ्या या वडिलांच्या मागे लागून पाच-सहा किलोमीटरवर असणाऱ्या या थोड्याशा मोठ्या गोरेगावात ती स्थायिक झाली ती केवळ मुलांच्या शिक्षणाच्या काळजीनं. वडील मुंबईत नोकरीला. पाचवीपासून अशोकदादा गोरेगावला राहिले. सातवीची स्कॉलरशिप, वक्तृत्व स्पर्धा, मोफत वाचनालयात पुस्तकं वाचणं या सगळ्यातून लेखक बनण्याची त्यांची प्रक्रिया नकळत सुरू झाली.
अशोकदादा म्हणाले, ‘नंतर मुंबईत आलो. विलेपार्ले इथे जागा शोधताना जागा दाखवणारा सांगत होता, इथे प्र. श्री. नेरूरकर राहतात, तेंडुलकर राहतात. लेखकांना खूप मान होता. समाजात स्थान होतं. त्यामुळे आपण काहीतरी उत्तम करणं म्हणजे लेखक होणं असं मला वाटायला लागलं. मी लेखक व्हायला ही परिस्थितीही कारणीभूत ठरली. कॉलेजला अॅडमिशन घेतली ती सायन्सला. तिथेही व. दि. कुलकर्णी, सदा कऱ्हाडे शिकवायला होते. साहित्यविषयक आवडीला त्यानं खतपाणीच मिळालं. लोकमान्य सेवा संघाचा सभासद होता एक मित्र. त्याच्या नावावर पुस्तक घेऊन वाचायचो. जी. ए., श्री. दा. पानवलकर पूर्ण वाचले.’
अशोकदादांच्या सांगण्यात त्यांच्या आर्थिक ओढाताणीच्या खुणा सतत जाणवत होत्या, पण त्यांच्या वैचारिक समृद्धतेच्या आड त्यांनी त्या परिस्थितीला कधीही येऊ दिलं नाही. त्यांच्या आईचा ध्येयनिष्ठ वृत्तीचा वारसा ते पुढे चालवत होते. परिस्थितीमुळे इंजिनीयरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली तरी नोकरी करून स्वतःचा स्वतः अभ्यास करत ते ग्रॅज्युएट ऑफ टेलिकॉम इंजिनीअर झाले. नोकरी करताना ‘संचारिका’चे साहित्य विभागप्रमुख झाले. ‘अंतरंग हाऊस’ मॅगझीन त्यांनी सांभाळलं. आयडियल बुक डेपोत स्तंभलेखक मंच स्थापन करून नियमित चर्चा घडवून आणल्या. शनिवार आणि रविवार सुट्टी असायची. ते दिवस लेखनासाठी राखून ठेवले होते त्यांनी. म्हणूनच नोकरी, लेखन आणि अंतरंगचं काम अशी तिहेरी लढत ते लढू शकले. वर्तमानपत्रातून केलेल्या स्तंभलेखनातून ‘रुपेरी पडद्याआड’, ‘मुलखावेगळे छांदिष्ट’ अशी पुस्तकं प्रकाशित झाली.
अशोकदादा सांगत होते, ‘चित्रपटाचा पडदा जिवंत करणारे सितारे आणि चित्रतारका, चित्रपट विश्वाला नेहमीच परिचित असतात. पण चित्रपट सर्वांगांनी यशस्वी करणारे जे पडद्यामागचे दिग्गज असतात त्यांचा चित्रपटरसिक आणि चित्रपटवाचक यांच्याशी क्वचितच संबंध येतो हा विचार मनाशी बाळगून त्या त्या क्षेत्रातल्या पडद्यामागच्या कलावंतांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून अनुभवांची जी शिदोरी मिळाली ती रसिकांसमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला ‘रुपेरी पडद्याआड’ मधून.’ ‘मुलखावेगळे छांदिष्ट’ ही कल्पना त्यांना कशी सुचली हे सांगताना ते म्हणाले, ‘तसा प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच. चांगल्या गोष्टींचा छंद असणं ही बाब सुसंस्कृत माणसाचं लक्षण मानली गेली आहे. छांदिष्ट माणसं समाजाचं भूषण असतात. त्यांच्याबद्दल समाजाला सांगावं असं वाटलं म्हणून लिहिलं.’
‘51 गाजलेली भाषणं’ हे त्यांचं आणखी एक गाजलेलं पुस्तक. लोकमान्य टिळक, सीडी देशमुख, वि. दा. सावरकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रबोधनकार ठाकरे, जयंत नारळीकर, बाबासाहेब पुरंदरे, वि. वा. शिरवाडकर, मेधा पाटकर अशी 51 उत्तमोत्तम भाषणं त्यांनी संपादित केलेली आहेत. नुकतीच त्याची दुसरी आवृत्तीदेखील प्रकाशित झाली आहे. सी. डी. देशमुखांवरचं त्यांचं पुस्तक आज उपलब्ध नसलं तरीही वारंवार त्याबद्दलची चौकशी अनेकांकडून त्यांच्याकडे होत असते इतकं ते लोकप्रिय आहे. त्यांचं आगामी पुस्तक ‘दिलीपकुमार…’ लोकांना दिलीपकुमारबद्दलच्या माहिती नसलेल्या अनेक सत्यघटनांची मनोरंजक आणि उद्बोधक अशी ओळख करून देणार आहे.
सतत कार्यमग्न असणाऱ्या या साहित्य संघाच्या नियामक मंडळावर आणि सध्या कार्यकारिणीवर निष्ठेनं काम करणाऱ्या या, नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या या, निरनिराळी चर्चासत्रं, व्याख्यानं भरवण्यासाठी आत्मीयतेनं, स्वयंसेवकाच्या वृत्तीनं काम करणाऱ्या अशोकदादांच्या घरातून जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी माझ्या हातात अत्तराची छोटीशी कुपी ठेवली. ‘आमच्याकडून ही छोटीशी भेट’ असं अंजलीताई म्हणाल्या. आपल्या आयुष्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता विचारांचे मधुकण गोळा करून समाजाला सकारात्मकतेचा सुगंध देण्याच्या त्यांच्या उद्देशाचीच ती प्रतीकात्मक भेट वाटली मला.






















































