
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. ही मदत आठवडय़ात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील आठ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असून सुमारे 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हे पैसे अंदाजपत्रकात नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले. पुढील 15 दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सध्या विविध जिह्यांमध्ये निधी वेगवेगळय़ा कारणांसाठी वितरित करण्यात आला आहे. काही ठिकाणी अंशतः रक्कम जमा झाली आहे. याचे कारण म्हणजे आम्ही ठरवले होते की, ज्या-ज्या जिह्यांचे प्रस्ताव येतील तशी त्यांना मदत देण्यात आली. त्यामुळे एनडीआरएफची मदत मिळाली अशी शंका घेण्याची गरज नाही. प्रथम दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत जमा झाली होती. त्यानंतर एक हेक्टरसाठी 648 कोटींची मदत करण्यात आली आहे.
15 दिवसांत पैसे जमा
मंत्रिमंडळ बैठकीत जमा झालेल्या मदतीची रक्कम येत्या 15 दिवसांत मिळेल असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘योग्य पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, अपात्र शेतकऱ्यांना तीन मिळू नये यासाठी सरकार काळजीपूर्वक काम करत आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात पुनर्पडताळणी केली जात आहे. पुढील 15 ते 20 दिवसांत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. या कालावधीत 90 टक्के शेतकऱ्यांना मदत पोहोचेल. निधीची कोणतीही कमतरता नाही. 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजपैकी सुमारे 21 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. यापैकी 8 हजार कोटी रुपये आधीच वितरित झाले असून आणखी 11 हजार कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे दिले जातील.



























































