शहीद भालचंद्र झोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

1471

हिंदुस्थानी सैन्य दलात कर्तव्यावर असताना शहीद झालेले हरचेरी येथील सुभेदार भालचंद्र रामचंद्र झोरे यांच्या पार्थिवावर रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या हरचेरी या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभेदार झोरे हे 53 वर्षांचे होते व ते अलाहाबाद येथे कर्तव्यावर असताना त्यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आज पहाटे 6 वाजता मुंबई मार्गे त्यांच्या मूळ गावी हरचेरी येथेआणण्यात आले. फूलांनी सजविलेल्या रथावर तिरंग्यात गुंडाळलेल्या  त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सकाळी 9 वाजता निघाली. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठया प्रमाणावर अंत्ययात्रेत उपस्थिती लावली.  सध्या शहीद झोरे यांचे कुटुंब पुणे येथे वास्तव्यासाठी होते. झोरे कुटुंबाचे अधुनमधून विशेष कामानिमित्ताने गावाला येणे जाणे असायचे.

प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.  त्यानंतर बंदुकीच्या 21 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली व मानवंदनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सुभेदार भालचंद्र झोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या