फुणगूससह संगमेश्वर परिसराला पुराचा तडाखा; भातशेती पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी परिसरासह रामपेठ व बाजारपेठ भागाला पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शास्त्रीखाडी आणि सोनवी नदीने नेहमीची पातळी ओलांडत सखल भागांत शिरकाव केला आहे. परिणामी शेतजमिनी, बाजारपेठा आणि खाडीलगतची गावे जलमय झाली असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

फुणगूस व रामपेठ बाजाराला पुराचा वेढा

सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे शास्त्रीखाडी व सोनवी नदीने धोक्याची पातळी पार केली. फुणगूस येथील जुन्या बाजारपेठेत सलग दोन दिवस पुराच्या पाण्याने ठाण मांडले, तर संगमेश्वर आठवडा बाजार व रामपेठ भागात सोमवारी, मंगळवारी पुराचे पाणी घुसले होते. व्यापाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवले. पावसाच्या सततच्या सरींमुळे हे सामान स्थलांतरित करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.

भातशेती जलमग्न, शेतकऱ्यांची धास्ती

फुणगूस, कोंडये, डावखोल, मांजरे, मेढे, परचुरी, पिरंदवणे, डिंगणी, भिरकोंड आणि असुर्डे या खाडीलगतच्या शेतजमिनीत नदीचे पाणी शिरले आहे. हिरव्यागार भातशेतीत गाळ व केरकचरा साचत असून, पाण्यात जास्त काळ शेतं बुडाल्याने पीक कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

कोंडअसुर्डे कॉजवे पाण्याखाली

संगमेश्वर करजुवे तसेच डिंगणी फुणगूस मार्गावरील महत्त्वाचा कोंडअसुर्डे कॉजवे नदीपात्रातील पाण्याखाली गेला आहे. उंची कमी असल्याने दरवेळी पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. गेल्या दोन दिवसांपासून हा मार्ग बंद राहिल्याने सुमारे ३० ते ३५ गावांशी संपर्क तुटला गेला आहे.

दैनंदिन जीवन विस्कळीत

गेल्या दोन दिवसांच्या मुसळधारेमुळे रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप आले. पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही वेळ पावसाने उसंत घेताच पुराचे पाणी ओसरू लागले होते; मात्र पुन्हा पाऊस वाढताच पाण्याची पातळीही झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे नागरिकांना अधिक मोठा पूर येण्याची भीती वाटत आहे.