फोर्टमधील रिकाम्या इमारतीला भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पहाटे साडेचार वाजता दक्षिण मुंबईतील कोठारी मॅन्शन ही चार मजली इमारत या आगीत संपूर्ण जळाली. धोकादायक असलेली इमारत रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र जळालेल्या इमारतीचा भाग कोसळल्यामुळे अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले तर अग्निशमन दलाच्या शिडीचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने भीषण स्वरूप धारण केले. पहिल्या मजल्यावर लागलेली आग इतकी झपाटय़ाने पसरत गेली की संपूर्ण इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. त्यामुळे ५ वाजून ३८ मिनिटांनी लेव्हल-४ ची आग घोषित करण्यात आली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दोन जवान जखमी
आगीच्या प्रचंड ज्वाळा व मोठय़ा प्रमाणात पसरलेल्या धुरामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या इमारतीचा काही भाग अग्निशमन दलाच्या शिडीवरच कोसळला व त्यात दोन जवान जखमी झाले. सुहास माने आणि सुधीर देवळेकर अशी या दोन जवानांची नावे असून त्यांना पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जवानांच्या हाताला, मानेला व पायाला मार लागला आहे. धोकादायक अवस्थेत ही इमारत उभी असून कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती आहे. सकाळी साडेसहा वाजता या इमारतीचा जळालेला भाग बाजूच्याच पटेल मॅन्शन इमारतीवरही कोसळला.

रहिवाशांविरुद्ध गुन्हा दाखल
म्हाडाने या इमारतीच्या दुरुस्तीला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते, मात्र तरीही दुरुस्ती हाती घेण्यात आली नव्हती. नागराज जैन आणि सायली सावंत या दोन रहिवाशांच्या नावे एनओसी दिलेली असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पालिकेने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
-किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ए वॉर्ड