विद्यापीठाला उपरती, एफवाय, एसवायच्या परीक्षा आता कॉलेजस्तरावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ias-exams-bta1
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

मागील दोन वर्षांपासून विद्यापीठामार्फत होणाऱया एफवाय (प्रथम वर्ष पदवी) आणि एसवाय (द्वितीय वर्ष पदवी)च्या परीक्षा आता कॉलेज स्तरावर होणार आहेत. बुधवारी पार पडलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मध्यंतरी विद्यापीठामार्फत होणऱया या परीक्षांमुळे महाविद्यालयांना फारच अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर दोन वर्षांनंतर निर्णय चुकल्याची उपरती विद्यापीठाला झाली आहे.

यापूर्वी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत तयार केले जात होते, मात्र यामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील महाविद्यालये तसेच रात्र महाविद्यालयांची मोठी गैरसोय होत होती. तसेच विद्यापीठाच्या लांबलेल्या वेळापत्रकामुळे शैक्षणिक सत्राची अपूर्णता, तृतीय वर्षाच्या परीक्षांना होणारा उशीर, विद्यापीठातील मनुष्यबळाची अपुरी उपलब्धता यामुळे महाविद्यालयाने जुन्याच पद्धतीने कॉलेज स्तरावर परीक्षा घ्याव्यात अशी मागणी होत होती. याविषयी निर्णय घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या शिफारशींनुसार विद्या परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते एफवाय आणि एसवायच्या सर्व परीक्षा कॉलेजस्तरावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षांवर विद्यापीठाचा वॉच
कॉलेजस्तरावर घेण्यात येणाऱया परीक्षांवर विद्यापीठाचा वॉच असणार आहे. प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चारही अधिष्ठाता यांच्या समितीचे गठण केले जाणार असून या समितीच्या माध्यमातून कॉलेजमार्फत संपूर्ण अभ्यासक्रम शिकला जातो का, अध्ययन व अध्यापनाचा 180 दिवसांचा कार्यकाळ पाळला जातो की नाही, प्रश्नपत्रिकांचा दर्जा कसा आहे, पेपरसेटिंग, मूल्यांकन, परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये समानता आणण्यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली लवकरच तयार केली जाणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. लीलाधर बनसोड यांनी दिली.