
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले धरणाची संचय क्षमता १२६.१५ मीटर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी १२०.४० मीटर क्षमतेची आवश्यकता असते. सध्या धरणात एकूण ६४.४३४ दश लक्ष घन मीटर पाणी साठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा ६४.११२ दश लक्ष घन मीटर एवढा आहे. सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० मिनिटांनी धरण भरल्यानंतर जलपूजन करण्यात आले.
गडनदी धरण भरुन वाहू लागल्याने नदीपात्राच्या पाण्यात वाढ होताच पाटबंधारे विभागाने नदी किनारी गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्यास शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वत:सह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतक-यांना वरदान ठरु पाहत आहे. धरणात क्षमतापूर्ण पाणीसाठा सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकामध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
सध्य गडनदी धरण क्षेत्रात पावसाला जोर असून २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ७४ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गडनदी धरण पहायला जाणा-यांनी धरणात उतरु नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये. नागरीकांनी आपली खबरदारी घ्यावी, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांनी केले आहे.




























































