Gadchiroli News – मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलांना भरधाव ट्रकने चिरडले असून यात चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. गडचिरोली-नागपूर महामार्गावरील काटली येथे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काटली गावातील 6 मुलं पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली. रस्त्यावर व्यायाम करत असतानाच भरधाव वेगात आलेल्या ट्रकने मुलांना चिरडले. यात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी गडचिरोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. अन्य दोन मुलांना प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलवण्यात आले आहे.

टिंकू नामदेव भोयर (वय – 14), तन्मय बालाजी मानकर (वय – 12), क्षितिज मेश्राम (वय – 13) आणि तुषार मारबते (वय – 12) अशी मृतांची नावे आहेत, तर आदित्य कोहपरे, दिशांत मेश्राम (सर्व रा. काटली) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील रक्तमासाचा चिखल पाहून मुलांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या अपघातानंतर काटली गावावर शोककळा पसरला असून गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेर स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही गोंधळ सुरू असल्याचे कळते.