मंथन – अँथ्रोपिक विरुद्ध पेंटागॉन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश काळे

पेंटागॉन आणि अँथ्रोपिक या एआय क्षेत्रातील दिग्गज कंपनींमध्ये निर्माण झालेला वाद सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. या संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे लॉड या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा लष्करी मोहिमांमध्ये आणि स्वायत्त शस्त्रास्त्रांमध्ये केला जाणारा वापर हे आहे. हा वाद भविष्यातील युद्धनीती द एआयच्या मानवी नियंत्रणाबाबत एक मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील अग्रेसर कंपनी असणाऱया अँथ्रोपिकने अलीकडेच लाँच केलेल्या टूल्समुळे जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांना कशा प्रकारे धक्का दिला हे आपण पाहिले, पण याच अँथ्रोपिक कंपनीचा पेंटागॉन या अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयासोबत सुरू असलेल्या एका वादामुळे सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेला हा संघर्ष एका व्यावसायिक करारापुरता मर्यादित नाहीये. तो भविष्यातील युद्धनीती आणि मानवी मूल्यांच्या चौकटीवर प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी अँथ्रोपिकचा लॉड हा प्रगत एआय प्रकल्प असून त्याचे लष्करी उपयोजन हा कळीचा मुद्दा बनला आहे.

अँथ्रोपिक आणि पेंटागॉन यांच्यात जुलै 2025 मध्ये 200 दशलक्ष डॉलर्सचा करार झाला होता. याअंतर्गत लॉड हे अमेरिकेच्या गोपनीय लष्करी नेटवर्कवर तैनात होणारे पहिले ‘फ्रंटियर एआय’ मॉडेल ठरले. या करारानुसार, पेंटागॉनने अँथ्रोपिकच्या ‘स्वीकार्य वापर धोरणांचे’ (अॅक्सेप्टेबल युज पॉलिसी) पालन करणे बंधनकारक होते. सुरुवातीला पेंटागॉनने या तंत्रज्ञानाचा वापर केवळ माहितीचे विश्लेषण आणि प्रशासकीय कामांसाठी केला जाईल असे संकेत दिले होते. मात्र जसजसा या तंत्रज्ञानाचा विस्तार होत गेला, तसतशी अमेरिकन लष्कराची महत्त्वाकांक्षा वाढली आणि त्यांनी लॉडचा वापर प्रत्यक्ष युद्धभूमीवरील रणनीती ठरवण्यासाठी करण्याची मागणी लावून धरली. जानेवारी 2026 मध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना पकडण्यासाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन अॅब्सोल्युट रिझॉल्व्ह’ मध्ये लॉडचा वापर केल्याची माहिती समोर आल्यानंतर अँथ्रोपिकने काही प्रश्न उपस्थित केले.

अँथ्रोपिक ही कंपनी मुळातच एआय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमोदेई यांनी सातत्याने असा पवित्रा घेतला आहे की, एआयचा वापर मानवाच्या विनाशासाठी किंवा कोणाचेही नियंत्रण नसलेल्या स्वायत्त शस्त्रास्त्रांमध्ये केला जाऊ नये. याउलट पेंटागॉनचे म्हणणे असे आहे की, रशिया आणि चीनसारख्या देशांशी मुकाबला करण्यासाठी अमेरिकेकडे सर्वात शक्तिशाली व कोणत्याही निर्बंधांशिवाय काम करणारे एआय मॉडेल असणे आवश्यक आहे. जर अमेरिकेने स्वतवर नैतिक बंधने लादली तर शत्रू देश या तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक सुरक्षा धोक्यात आणू शकतात, असा दावा संरक्षण विभागाकडून केला जात आहे. या वैचारिक मतभेदामुळेच अँथ्रोपिकने त्यांच्या सिस्टिममधील सुरक्षा कवच शिथिल करण्यास नकार दिला आणि तिथूनच या संघर्षाला खरी सुरुवात झाली.

जानेवारी 2026 मध्ये हा वाद तेव्हा अधिक चिघळला जेव्हा पेंटागॉनने अँथ्रोपिकला त्यांचे तंत्रज्ञान पूर्णपणे लष्कराच्या हवाली करण्याचे आदेश दिले. पेंटागॉनच्या मते त्यांनी या प्रकल्पावर कोट्यवधी डॉलर्स खर्च केले असल्याने त्यावर केवळ सरकारचे नियंत्रण असायला हवे. मात्र अँथ्रोपिकने असा युक्तिवाद केला की, त्यांचे सॉफ्टवेअर हे केवळ एक साधन नसून ती एक बौद्धिक संपदा आहे. सबब तिचा वापर लोकशाही मूल्यांच्या विरोधात करता येणार नाही. विशेषत सामूहिक पाळत ठेवणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय प्राणघातक हल्ले करणे या दोन गोष्टींवर कंपनीने आपली ‘लक्ष्मणरेषा’ ओढली आहे. या नकारामुळे संतापलेल्या पेंटागॉनने अँथ्रोपिकला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या कंपन्यांच्या यादीत टाकण्याची धमकी दिली.

फेब्रुवारीच्या अखेरीस पेंटागॉनने आपली धमकी प्रत्यक्षात आणली आणि अँथ्रोपिकला सप्लाय चेन रिस्क म्हणून घोषित केले. या निर्णयामुळे अँथ्रोपिकचे लॉड हे मॉडेल अमेरिकन लष्कराच्या सर्व यंत्रणांमधून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. एका बाजूला अँथ्रोपिकला बाहेरचा रस्ता दाखवला जात असतानाच दुसऱया बाजूला सॅम ऑल्टमन यांच्या ओपनएआय या कंपनीसोबत पेंटागॉनने तातडीने नवा करार केला. या संपूर्ण वादाचा परिणाम केवळ या कंपन्यांवरच झाला नाही तर संपूर्ण सिलिकॉन व्हॅलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जर सरकार एखाद्या कंपनीला त्यांच्या धोरणांशी सहमत नसल्याबद्दल देशद्रोही ठरवू शकत असेल तर तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्याचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

पुढील काळात हा संघर्ष कोणत्या दिशेला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण यावरच एआयच्या वापराचे जागतिक नियम ठरवले जाणार आहेत. जर पेंटागॉनची भूमिका मान्य झाली तर भविष्यात युद्धे ही माणसांऐवजी अल्गोरिदमद्वारे लढली जातील. यामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे जर एआयने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर त्याला जबाबदार कोणाला धरायचे हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अँथ्रोपिकने घेतलेली भूमिका ही कदाचित त्यांना सध्या महागात पडत असली तरी भविष्यातील मानवजातीसाठी ती एक सुरक्षित कवच ठरू शकते असे एका मोठ्या वर्गाचे म्हणणे आहे. याउलट लष्करी तज्ञांच्या मते युद्धात नैतिकता शोधणे हे पराभवाचे लक्षण असू शकते. त्यामुळे येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करावा आणि कोणाच्या नियंत्रणाखाली करावा याचा फैसला करणारा असेल.

सध्याची स्थिती पाहता अँथ्रोपिकने आपल्या उत्पादनांना आता सामान्य ग्राहकांसाठी अधिक सुलभ बनवण्यावर भर दिला आहे. लष्करी कंत्राट रद्द झाल्याने त्यांच्या महसुलात मोठी घट झाली असली तरी त्यांच्या ‘लॉड‘ या अॅपला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पेंटागॉनच्या बंदीमुळे त्यांना अनेक मोठ्या कॉर्पोरेट प्रकल्पांमधूनही वगळले जाण्याची भीती आहे. या वादाचा पुढचा टप्पा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर एआय नियमन करण्यासाठी होणारी परिषद असेल, जिथे अमेरिका आपल्या लष्करी गरजांना केंद्रस्थानी ठेवून नियम बनवण्याचा प्रयत्न करेल. लॉडने दिलेला हा लढा आधुनिक काळातील डेव्हिड आणि गोलियाथ यांच्या युद्धासारखा वाटतो. कारण एका छोट्या कंपनीने महासत्तेच्या अवास्तव मागण्यांना नकार देण्याचे धाडस दाखवले आहे.
( लेखक संगणकतज्ञ आहेत)