
रेशनवर मिळणाऱ्या धान्य पुरवठय़ात शासनाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाची सरकारी उपलब्धता घटल्याने नोव्हेंबरपासून दोन महिन्यांसाठी रेशनवर गव्हासोबत ज्वारी दिली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या ताटात आता भाकर वाढली जाणार असून, हिवाळ्यातील जेवणाची चव बदलणार आहे.
प्राधान्य पुटुंबातील लाभार्थ्यांना आतापर्यंत प्रति व्यक्ती दोन किलो गहू मिळत होता. मात्र, आता एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी असे वाटप होईल, तर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना आठ किलो गहू आणि आठ किलो ज्वारी मिळणार आहे. शासनाने गव्हाचे नियतन जवळपास 50 टक्क्यांनी कमी केले असून, तेवढय़ाच प्रमाणात ज्वारीचा समावेश केला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत हा बदल लागू होणार आहे.
राज्य शासनाने यंदा मोठय़ा प्रमाणावर ज्वारीची खरेदी केल्याने पुरवठा विभागाने सर्व जिह्यांना नियतन मंजूर केले आहे. गहूऐवजी ज्वारी मिळणार असल्याने अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तर काहींनी ज्वारी दिली तरी तिचा दर्जा चांगला असावा, अशी मागणी केली आहे. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात गव्हाची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे सध्या ज्वारी दिली जाणार असून, हा तात्पुरता उपाय आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांनंतर गव्हाचा पुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाईल. शासनाने हिवाळ्याच्या हंगामात ज्वारीचे वितरण करण्याचा निर्णय घेतल्याने पोषणमूल्य आणि हंगामी गरज या दोन्ही बाजूंचा विचार केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारी खरेदीमुळे बाजारात ज्वारीचा साठा वाढल्याने मुक्त बाजारातील ज्वारीच्या भावात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो. व्यापाऱ्यांनीही धान्य सरकारी योजनेत गेल्याने बाजारातील खप कमी झाल्याची तक्रार केली आहे.


























































