पर्यावरणपूरक विसर्जनाला कोल्हापूरकरांचा प्रतिसाद; जिल्ह्यात 4 लाख गणपतीमूर्तींचे विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात सुमारे चार लाखांहून अधिक घरगुती गौरी-गणपतींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यात शहरात 53 हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन झाले, तर 180 टन निर्माल्य संकलन झाले.

सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होणारा कोल्हापुरातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. नद्या, तलावांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूरकरांनी मूर्ती दान संकल्पनेतून पर्यावरणपूरक विसर्जनाची सुरू केलेली चळवळ ते डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. मात्र, महापूर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर मर्यादा आल्या; पण उत्साह होता. यंदाही राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करत, कोल्हापूरकरांनी विनामिरवणूक गणेशाचे स्वागत केले. तसेच गर्दी टाळत घरगुती गणेशांचे विसर्जन केले. भागाभागात कृत्रिम कुंडांसह काहींनी घरीच मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. ग्रामीण भागात सुमारे 2 लाख 42 हजार 191 मूर्तींचे संकलन झाले. नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रासह घरीच सुमारे एक लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. निर्माल्य दानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात 130 टन, तर ग्रामीण भागात 50 टनांहून अधिक निर्माल्य संकलन झाले. यंदा गौराई व शंकरोबासाठी लागणाऱया पारंपरिक वनस्पतींची उपलब्धता पाहता निर्माल्याचे प्रमाणही काहीसे कमी दिसून आले. संकलित निर्माल्यापासून खतनिर्मितीसाठी काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.