
‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात शुक्रवारी पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. दुपारी चार वाजल्यापासून गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली. गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात पाचव्या दिवशीही कायम आहे. विसर्जन ठिकाणी नगर पालिका प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने मूर्ती विसर्जनसाठी सुविधा दिल्या आहेत. पालिकेच्या वतीने किनारपट्टीवर निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले होते. पोलीस प्रशासनानेही सर्वच विसर्जन मार्ग व किनारपट्टीवर बंदोबस्त ठेवला होता.
समुद्र किनारे, नदी, तलाव, वहाळ, गणेशघाट आदी ठिकाणी प्रथेप्रमाणे बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी विसर्जन सोहळा पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी ठिकठिकाणी दिसून येत होती. मालवण शहर परिसरात सुमारे आठशे घरगुती बाप्पांचे संख्येने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी गौरी गणपती विसर्जन होणार आहेत. तर अनेक ठिकाणी अकरा दिवस अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या संख्येने बाप्पांचे विसर्जन होते.



























































