रेल्वे रूळ ओलांडून बाप्पा गेले गावाला

603

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’… अशा गर्जनेत, ढोल-ताशा, डीजे व बॅन्जोच्या निनादात आज घरगुती गणपतीसोबत माहेरपणाला आलेल्या गौराईचे साश्रुनयनांनी ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघत असताना कल्याणमध्ये मात्र रेल्वे रूळ ओलांडून बाप्पा गावी गेल्याचे समोर आले.

कचोरे कोळीवाडा येथे खाडीकिनारी असलेल्या विसर्जन स्थळाकडे जाण्यासाठी गणेशभक्तांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने गणेशभक्त गेली अनेक वर्षे ही जीवघेणी कसरत करत आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार अथवा अपघात घडून नये यासाठी विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी स्थानिक सागरदेवी सेवक मंडळ आणि आरपीएफचे जकान तैनात असतात. त्यांच्या मदतीने यंदाही गणेशभक्तांनी विसर्जन पार पाडले असले तरी आणखीन किती वर्षे रेल्वे रूळ ओलांडून गावी जायचे हा प्रश्न बाप्पालाही पडला असावा.

मिरवणुकीला पावसाचा ‘झिंगाट’

बाप्पाच्या आगमनापासून मुक्काम ठोकलेल्या वरुणराजाने आजही जोरदार बरसात केली. विसर्जन मिरवणुकीत पावसाचाच ‘झिंगाट’ असल्याने गणेशभक्तांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. पावसामुळे सायंकाळी उशिरापर्यंत गणेशभक्तांनी विसर्जन टाळले. रात्री उशिरापर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये 1067 सार्वजनिक तर एक लाख 47 हजार 369 घरगुती गणपती आणि 15 हजार 33 गौरींचे विसर्जन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या