
सामना ऑनलाईन, मुंबई
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही खूशखबर आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या मोटारींना 10 ते 13 सप्टेंबर या काळात टोलमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे व कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून माफी देण्यात येणार आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत व वाहतुकीच्या व्यवस्थापनाबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पुणे व कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात येईल. गणेश विसर्जनानंतर मुंबईला परत येणाऱ्या वाहनांना 23 सप्टेंबरपर्यंत टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत एसटी बसेसनाही लागू केली आहे. या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकरसुद्धा उपस्थित होते. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना ट्रेन व एसटी बसचे तिकीट मिळत नाही. खासगी लक्झरी बसचे दर वाढतात. त्यामुळे मुंबईतील गणेशभक्त खासगी मोटारीने कोकणात जातात. त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
ट्रफिक वॉर्डन व डेल्टा फोर्स
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाहतूककोंडी टाळण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ट्रफिक वॉर्डन तसेच वाहतूक पोलीस आणि डेल्टा फोर्स या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांची कुमक वाढवावी तसेच पथकर नाक्यावर वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
खड्डेदुरुस्तीच्या सूचना
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान रस्त्यात वाहन बंद पडल्यास मदतीसाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात येईल. महामार्गावर रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पाली-वाकण, पाली-खोपोली या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या असून वाहनांना टोल कंपनीकडून कोणताही त्रास होणार नाही.
कोकणात जाणाऱ्या वाहनांना ‘गणेशोत्सव-2018 कोकण दर्शन’ या नावाचे स्टिकर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात येतील. टोल सवलतीचा कालावधी हा गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि नंतर येताना विसर्जनापर्यंत देण्यात आला आहे. तसेच वाशी टोलनाक्यावरही सवलत देण्यात आली आहे.

























































