एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत आज कोकणासहीत संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे आगमन झाले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाख 66 हजार 986 घरगुती आणि 116 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पाच्या आगमनावेळी सकाळी वरूणराजानेही हजेरी लावली मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. रत्नागिरी तालुक्यातील कर्ले-आंबेशेत घरगुती गणेश आगमनाची मिरवणूक वाजत-गाजत निघाली. या मिरवणूकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी आणि उपजिल्हाप्रमुख संजय साळवी या मिरवणूकीत सहभागी झाले. गणपतीबाप्पाचे आगमन शांततेत पार पडले. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. कोकण रेल्वेच्या गाड्यांना तुडुंब गर्दी आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांना ट्रॅफिक जामचा फटका बसला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.