
कुडाळ व सावंतवाडीदरम्यान असणाऱ्या झाराप या दुर्लक्षित स्थानकात आतापर्यंत फक्त दिवा – सावंतवाडी गाडी थांबत होती. गेल्या वर्षी गणेशोत्सवात फक्त १४ विशेष रेल्वे गाड्यांना थांबा दिला होता. गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी या गणेशोत्सवात जादा गाड्यांना थांबा मिळावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रेल्वे महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन मागणी केली होती. शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून या गणेशोत्सव काळात तब्बल १७४ एक्स्प्रेसना थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे. या रेल्वे गाड्यांचे कोकणवासीय ढोलताशांच्या गजरात स्वागत करणार आहेत.
शिवसेनेचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेऊन कोकणवासीयांसाठी जादा रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरेसहित १०० हून अधिक गावांना झाराप हे मध्यवर्ती ठिकाण आहे.
गणेशोत्सवात झाराप स्थानकात एक्स्प्रेसना थांबा दिला तर चाकरमान्यांची मोठी सोय होईल अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली होती. शिवसेनेच्या मागणीला यश आले असून १७४ फेऱ्यांना झाराप येथे थांबा देण्यात आला असल्याचे कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांना रेल्वेने लेखी कळवले आहे.
गणेशोत्सव काळातील पहिली रेल्वे मुंबईवरून २२ ऑगस्ट रोजी सुटणार आहे. दुपारी २ वाजता झाराप स्थानकात ही गाडी येईल. कोकणवासीय या गाडीचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करणार आहेत.