गणेशभक्तांचा प्रवास सुखरूप होणार; 900 पोलीस बनणार ‘विघ्नहर्ता’ रायगड पोलीस दलाचा पनवेल ते पोलादपूर खडा पहारा

बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी ९०० पोलीस ‘विघ्नहर्ता’ बनणार आहेत. गेल्या चौदा वर्षांपासून रेंगाळलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीप्रमाणेच अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच जिल्हा पोलीस विभागामार्फत पोलीस अधिकारी, कर्मचारी, वॉर्डन, होमगार्डचा खडा पहारा ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. याबरोबरच अपघातानंतर कोणतीही कोंडी होऊ नये म्हणून क्रेन, रुग्णवाहिका, मॅकेनिक २४ तास असल्याने प्रवाशांना सुखरूप गाव गाठता येणार आहे.

गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून साजरा करण्यात येणार आहे. कोकणात घराघरात गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी जातात. यावेळी चाकरमानी खासगी वाहनांचा वापर मोठ्या संख्येने करत असल्याने गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वर्दळीत नेहमीपेक्षा दहा ते बारा पटीने वाढ होते. त्यामुळे वाहतूककोंडी तसेच इतर समस्यांचा सामना चाकरमान्यांना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा रायगड जिल्ह्यातील प्रवास सुखकर आणि विनाव्यत्यय व्हावा, यासाठी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. मात्र महामार्गावरील खड्यांचे विघ्न या प्रयत्नांवर पाणी पाडणार असल्याचे चित्र दिसून येते.

चाकरमान्यांनू.. गणपतीक गावाला सुखात जावा

७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २२ पोलीस निरीक्षक, ७२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७६२ पोलीस कर्मचारी व होमगार्डचा समावेश आहे. यासह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल तैनात करण्यात येणार आहेत.

पोलिसांना गस्तीसाठी जीप व मोटारसायकली असणार आहेत. तसेच संपर्कासाठी ७४ बिनतारी संच देण्यात येणार आहेत. अपघात किंवा गाडी बंद झाल्यास ती महामार्गावरून हटवण्यासाठी २० टोकण क्रेनची व्यवस्था.

२० रुग्णवाहिकांच्या फेऱ्याही महामार्गावर चालू राहणार आहेत. रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टर, परिचारिका असणार आहेत. सरकारी दवाखान्यांबरोबरच अपघातग्रस्तांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणार.

खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होणार

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, चाकरमान्यांचा प्रवास विना अपघात, सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मात्र जिल्हा प्रशासनासमोर महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न असणार आहे. महामार्गावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे वाहतूककोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागण्याची शक्यता आहे.

अवजड वाहनांना बंदी

२१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत १६ टन व त्यापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. यामधून दूध, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, भाजीपाला वाहनांना सूट आहे.