शहापूरच्या बाप्पांची ‘फॉरेन टूर’, दुबई, थायलंड, केनिया, जर्मनी, मलेशियामध्ये दीड हजार मूर्ती रवाना

गणेशमूर्तीचे माहेरघर असलेल्या पेणपाठोपाठ आता शहापुरातील बाप्पाही फॉरेनला निघाले आहेत. मूर्तिकार सुमित शेट्टी आणि केतकी शेट्टी या दाम्पत्याने बनविलेल्या आकर्षक गणेशमूर्तीची ख्याती सातासमुद्रापार गेली आहे. दुबई, थायलंड, केनिया, जर्मनी, मलेशिया, साऊथ आफ्रिका, लंडन या ठिकाणी दीड हजार मूर्ती विमानाने रवाना झाल्या आहेत.

कोरोना काळात सुमित शेट्टी यांची नोकरी गेली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला उपासमारीला सामोरे जायची वेळ आली होती, परंतु सुमित यांनी गणपती कारखान्यात काम केलेल्या अनुभवाच्या जोरावर पत्नी आणि मित्रांच्या मदतीने गणेशमूर्ती बनवून प्रदर्शन व विक्री व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी पेण येथून गणेशमूर्तीचा कच्चा माल आणून विविध प्रकारच्या मूर्ती बनवायचे काम सुरू करून सोशल मीडियावर बनवलेल्या मूर्तीची जाहिरात केली व त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

विघ्नहर्ता पावला

गणेशमूर्तीच्या व्यवसायामुळे रोजगार उपलब्ध झाला. आम्ही बनविलेल्या मूर्तीना बाहेरच्या देशातून मागणी येत असल्यामुळे जणू विघ्नहर्ताच पावला आहे. आमच्यावरील बेरोजगारीचे विघ्न गणपती बाप्पाने दूर केल्याचे शेट्टी दाम्पत्याने सांगितले. शहापुरात ६० गणपती मूर्ती बनवण्यापासून सुरू केलेला कारखाना आज ९ ते १० हजार गणेशमूर्ती बनवण्यापर्यंत पोहोचला आहे असेही ते म्हणाले.

सहा इंच ते चार फुटांपर्यंत मूर्ती बनवून विक्रीसाठी ठेवल्या असून त्याची किंमत १२०० रुपयांपासून २१ हजार रुपयांपर्यंत आहेत. गुजरात, संभाजीनगर, जालना, इंदोर, ठाणे, कल्याण, पालघर, पुणे येथून या गणेशमूर्तीना मागणी वाढली आहे.

चेंबूर येथेही गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्याचा कारखाना सुरू केला असून त्यात २१ बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.