
स्थळः रंगशारदा सभागृह
वेळः सायंकाळी 6 वाजता
गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. असे असतानाही पालिका आणि सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या अनेक समस्या अद्याप सोडवलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या सायंकाळी 6 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
गणपती मूर्तींचे विसर्जन, मंडप उभारणीबाबत वेगवेगळय़ा अटी-शर्ती, मूर्तीची उंची अशा विविध टप्प्यांवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. महापालिका आणि राज्य सरकारने गणेशोत्सव मंडळांच्या संबंधित समस्या सोडवलेल्या नाहीत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.