
लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.
भाजप आमदार हेमंत रासने यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव म्हणून साजरा करण्याची सूचना केली. त्यावर निवदेन करताना मंत्री आशीष शेलार यांनी ही घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला. या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळय़ांशी संबंधित आहे. त्या पद्धतीनेच आज चालू आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव आहे. आपल्या गणेशोत्सवाच्या बाबतीत सरकारने भूमिका घेतली असून पोलीस सुरक्षा असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषतः पुण्यातला महोत्सव असेल, मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल. त्यासाठी लागेल तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल. यानिमित्ताने त्यांनी पीओपी मूर्तींबाबतही भूमिका स्पष्ट केली. पीओपी मूर्तींवरील निर्बंध होते तेही बाजूला निघाले. न्यायालयाच्या निवाडय़ानुसार पीओपी मूर्ती बनवणे, डिस्प्ले करणे आणि विकणे यालाही परवानगी मिळाली आहे याकडे लक्ष वेधले. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
समन्वय समितीकडून निर्णयाचे स्वागत
सामाजिक एकता, बंधुता आणि समरसतेची समृद्ध परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून जाहीर केले. सरकारची ही घोषणा समस्त महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे म्हणत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबईतील हजारो सार्वजनिक मंडळांकडून दरवर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने उत्सवासंदर्भातील मंडळांच्या अडीअडचणी तातडीने सोडवल्या जातील आणि पीओपी मूर्तीच्या विसर्जनावर शासन लवकरच तोडगा काढेल, असा विश्वासही समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केला.