गणेश मंडळांना परवानग्या देण्यास चालढकल केल्यास याद राखा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

वर्षानुवर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱया मंडळांना परवानगी देणे ही महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. परवानग्या देण्यास चालढकल केलात तर याद राखा! मुंबईभर रस्त्यावर महाआरत्या करू, असा खणखणीत इशारा देतानाच गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार म्हणजे होणारच, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले.

मुंबईतील गणेश मंडळांना मंडप उभारण्यास व अन्य परवानग्या देण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. उभारलेले मंडप तोडले जात आहेत. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱयांना आज मरिन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात मार्गदर्शन केले. यावेळी मुंबईतील ४०५ गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शांतता गेली स्मशानात! उत्सव आवडत नसेल तर स्मशानात जा!

उद्धव ठाकरे यांनी यावेळी उत्सवाच्या आड येणाऱया कायदेपंडितांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी गणेश मंडळांबरोबर माझी भेट होते पण त्यांना कायद्याचे विघ्न येतेय या कारणासाठी ही भेट व्हावी अशी त्या गणरायाचीही इच्छा नसावी. विघ्नहर्त्या मंगलमूर्तीचे आगमन होण्यापूर्वीच ‘विघ्नकर्त्या’ कायदे पंडितांचे सोटे वाजतात. आनंदाच्या वेळेला ते काळ्या मांजरासारखे आडवे येतात. शांतता गेली स्मशानात! गणेशोत्सव हा धूमधडाक्यातच साजरा केला जातो. ज्यांना उत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल दहा दिवस स्मशानात जाऊन बसावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मेट्रो’चा खणखणाट ऐकू येत नाही का?

ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली न्यायालयात जाऊन गणेशोत्सवात विघ्न आणणाऱयांचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. ‘मेट्रो’च्या कामांमुळे होत असलेला खणखणाट त्यांना ऐकू येत नाही का? असे ते म्हणाले. मैदानात सभा घ्यायला मनाई करणाऱयांनी मेट्रोच्या कामासाठी मुंबईतील मैदाने खणून ठेवली आहेत. आझाद मैदानात भगदाड पाडले आहे. सिध्दीविनायकाच्या पाठीमागील मैदानही व्यापून टाकले आहे. मेट्रोच्या कामामुळे इमारती हादरत आहेत, रस्ते अडवले गेले आहेत, त्याचा त्रास यांना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला. गणपतीच्या काळात रात्रीचे दहा वाजले की पोलीस येऊन स्पीकरच्या वायरी काढतात मात्र दुसरीकडे मेट्रोचे काम रात्रीही करण्यासाठी न्यायालयात परवानगी मागितली जाते असे सांगत उद्धव ठाकरे यांनी, उत्सवाच्या आड याल तर खपवून घेणार नाही अशी तंबीच यावेळी दिली.

शिवसेना नेते, उद्योगमंत्री व मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि विभागप्रमुख, आमदार ऍड. अनिल परब यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपनेता रवींद्र मिर्लेकर, विनोद घोसाळकर, मीना कांबळी, राजकुमार बाफना, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आदी उपस्थित होते.

गणपती नवसाला पावतो का… हो पावतोच!

गणपती नवसाला पावतो का? असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना विचारले. त्यावेळी सर्वांनी होकारार्थी उत्तर दिले. गणपती मंडळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात. मोफत उपचार शिबिरे आयोजित करतात. डायलिसीस उपचार देतात. त्यातून अनेकांचे जीव वाचतात. म्हणजेच गणपती त्यांच्या नवसाला पावतो असे सांगतानाच अशी मदत उत्सवाआड येणाऱया त्या काळ्या मांजरांकडून होऊ शकते का, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

गणपतीला विरोध करणारे सरकार हिंदूद्रोहीच

मोहरम आणि दुर्गा विसर्जन एकाच दिवशी आल्याने ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये त्या दिवशी दुर्गा विसर्जनाला मनाई केली. त्यामुळे भाजपाने त्यांच्यावर ‘हिंदूद्रोही’ असल्याचा ठपका ठेवला. त्याचे उदाहरण देतानाच उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवात विघ्न आणणाऱयांवर प्रहार केला. राम मंदिर कधी होईल ते राम जाने! पण गणपतीला विरोध करणारे सरकार, मग ते कुणाचेही असो ते हिंदूद्रोहीच आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मी गणरायाला प्रार्थना करतो! तुझा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याची, तुझी आरती करण्याची शक्ती, ताकद शिवसैनिकांना दे. तुझा आशीर्वाद शिवसैनिकांवर कायम राहू दे!