लग्नानंतर दोन दिवसातच नववधू फरार, पतीची पोलिसात धाव

गंगाखेड तालुक्यातील एका तरुणाचे 29 जून रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरीने दागिन्यांसह पोबारा केला आहे. लग्नाच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

गंगाखेड तालुक्यातील धारखेड येथील रामभाऊ भालके यांच्या मुलाचे जळगाव येथील गायत्री नावाच्या तरुणीशी 27 जून 2025 रोजी लग्न पार पडले. भालके यांचे परिचित गंगाखेडचे भगवान बचाटे आणि नांदेडचे शेषेराव चिंतलवार यांनी हे स्थळ सुचवले होते. गायत्रीच्या कुटुंबीयांनी मुलगी गरीब असल्याचे सांगत लग्नापूर्वी 3 लाख रुपये रोख, सोन्याचे मंगळसूत्र व झुंबर, चांदीची चेन-जोडवे आणि कपडे घेण्याची अट घातली होती. हे सर्व देऊन लग्न पार पडले. लग्नानंतर दोन दिवसांनी म्हणजे 29 जून रोजी सत्यनारायण पूजेनंतर भालके कुटुंबीयांना एक फोन आला. फोनवरून सांगण्यात आले की, नववधू गायत्रीच्या वडिलांनी आत्महत्या केली असून, तिला तातडीने जळगावला घेऊन यावे लागेल. त्यामुळे गायत्री तिच्या पती व नातेवाईकांसोबत खासगी वाहनाने जळगावकडे रवाना झाली. मनमाड येथे पोहोचल्यानंतर गायत्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी ‘कोर्टात काम आहे’ असे सांगत पतीला थांबवून, गायत्रीला घेऊन गेले. त्यानंतर तिचा कोणताही संपर्क साधता आला नाही. भालके यांनी ही फसवणूक लक्षात येताच गंगाखेड पोलीस ठाण्यात ४ जुलै रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार भगवान बचाटे (गंगाखेड), शेषेराव चिंतलवार, शिवाजी

वाघटकर (नांदेड), मनीषा पाटील, मीनाक्षी जैन, मीना बोरसे, सुजात ठाकूर, अक्षय जोशी (सर्व जळगाव निवासी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार एकूण 3 लाख 66 हजार 960 रुपयांची फसवणूक झाली आहे. कारण प्रकरण जळगावमधील असल्याने याचा तपास आता जळगाव पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.