पासपोर्टमधील इंग्रजी शब्दांची बनवाबनवी

>>नवनाथ शिंदे

परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट विभागाकडे केलेल्या अर्जापासून पोलीस प्रशासनाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवून पासपोर्ट मिळेपर्यंत प्रक्रिया पार पाडावी लागते. गंभीर गुन्ह्यांतील अर्जदारांना पासपोर्ट काढताना न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच अर्जदाराला नियम-अटींनुसार पासपोर्ट दिला जातो. मात्र, कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध मोक्का कारवाई झालेली असतानाही त्याला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर त्याने पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी थेट स्वित्झर्लंड गाठले आहे. पासपोर्ट मिळविण्यासाठी किरकोळ चुकांसाठी सर्वसामान्यांना कागदपत्रांच्या दुरुस्तीसाठी वेठीस धरले जाते. मात्र, गुन्हेगारांसाठी सर्वकाही आलबेल असल्याचे घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील नामचीन गुंड नीलेश घायवळ सराईत असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या टोळीने किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार करीत दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी घायवळसह टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली. दरम्यान, गुन्हा दाखल होताच, पोलिसांपासून वाचण्यासाठी घायवळने मूळगावच्या पत्त्याचा वापर करून त्याने स्वित्र्झलंडला पलायन केले. त्यामुळे गुन्हेगाराचा पासपोर्ट व्हेरिफिकेशन करणाऱ्या अहिल्यानगरमधील स्थानिक पोलिसांपासून ते परदेशाचा व्हिसा मिळवून देणाऱ्यांनी पुणे पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक केली. त्यामुळेच कुख्यात गुंडाने पासपोर्ट PASSPORT REPUBLIC OF INDIA भारत गणराज्य पोलिसांची नजर चुकवून सुखरूपरीत्या परदेशात वास्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अहिल्यानगर पोलिसांकडून नीलेश घायवळ याने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवून संबंधित पासपोर्ट विभागाला सादर केले. त्यानंतर त्याला पासपोर्ट देण्यात आला. मात्र, पुण्यात राहत असतानाही त्याने याच ठिकाणाहून पासपोर्ट का काढला नाही? मूळगाव असलेल्या अहिल्यानगरमधील रहिवाशी पत्ता पासपोर्टसाठी का दिला, याबाबतचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, गुन्हेगारी कृत्यांमुळे आपल्याला पासपोर्ट मिळणार नसल्याची जाणीव घायवळला होती. त्यामुळे त्याने इंग्रजी शब्दात हेराफेरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे आडनाव वापरून पासपोर्ट मिळविला आहे. त्यासोबतच अहिल्यानगरमधील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा वरदहस्त त्याने मिळविला होता. त्यासोबतच पासपोर्ट विभागातही त्याने सेटिंग लावली होती. त्यामुळेच घायवळला फायदा झाला आहे.

परदेशात जाण्यासाठी आवश्यक पासपोर्ट आवश्यक दस्त आहे. पासपोर्ट मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर पासपोर्ट प्रशासनाकडून अर्जदाराने उल्लेख केलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यात वर्ग केला जातो. अर्ज प्राप्तीनंतर 21 दिवसांत पोलिसांकडून अर्जदाराचे व्हेरिफिकेशन करणे अपेक्षित आहे. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे अर्जदारांना दीड ते दोन महिन्यांचा विलंब ताटकळत सहन करावा लागतो. दरम्यान, पासपोर्ट सेवा वेबसाईटवर अर्ज केल्यापासून संबंधिताला 21 दिवसांच्या आतमध्ये व्हेरिफिकेशन केले जाते. पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखांतर्गत पासपोर्ट विभागाने अर्जाला ‘एनओसी’ दिल्यानंतर पासपोर्ट तयार होण्याचा मार्ग मोकळा होता.

सर्वसामान्यांना पासपोर्ट असा दिला जातो…

अर्जदाराकडून पासपोर्ट सेवा वेबसाईटवर नोंदणी केली जाते. त्यानंतर पासपोर्ट विभागाकडून अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी पाठवला जातो. पोलीस ठाण्याचे कर्मचारी अर्जदाराच्या घरी जाऊन व्हेरिफिकेशननंतर खात्री करतात. या प्रक्रियेसाठी 6 ते 8 दिवसांचा कालवधी जातो. त्यानंतर पोलीस ठाण्याकडून अर्ज विशेष शाखेतील पासपोर्ट विभागात पाठविला जातो. त्याठिकाणी अर्जदाराविरुद्ध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत का, याबाबत माहिती तपासली जाते. त्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो. संपूर्ण कागदपत्रांसह इतर माहिती तपासाल्यानंतर अर्ज पुन्हा विभागीय पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर दोन ते चार दिवसांत पोस्टाद्वारे पासपोर्ट अर्जदाराच्या हातात मिळतो.