नांदेडमध्ये 8 लाख 27 हजाराचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेने लक्ष्मीनगर भागात छापा टाकत 8 लाख 27 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या आदेशानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी लक्ष्मीनगर भागात पोलीस उपनिरीक्षक आनंद बिच्चेवार व त्यांची पथक पाठवत ही कारवाई केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर बायपास रोडवर एका घरात गांजा लपवून ठेवला होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घराबाबतची सविस्तर माहिती घेत तेथे छापा टाकला. त्याठिकाणी अहमद खान अनवर खान (रा.रहिमनगर देगलूर नाका), शेख अख्तर बेगम शेख मिया (रा.महेबूबनगर, लक्ष्मीनगर, बायपास रोड) यांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरात 41 हजार 350 किलो गांजा ज्याची किंमत 8 लाख 27 हजार रुपये एवढी आहे, आढळून आला. त्यानुसार जागीच पंचनामा करुन पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यात आणखी एक आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.