जागरूक…सजग तरुणाई!!

317

गणेश विसर्जनानंतर किनाऱ्यांवर मूर्तींचे भग्न अवशेष, निर्माल्य, प्लॅस्टिकचा कचरा, बाटल्या पाहायला मिळतात. ते स्वच्छ करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांबरोबरच मुंबईतील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थीही एकत्र जमून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास हातभार लावतात. त्यांच्या या स्वच्छता उपक्रमाविषयी जाणून घेऊया.

स्वच्छतेची आवड निर्माण होते
गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा अनुभव खूप मस्त असतो. दरवर्षी या उपक्रमात सहभागी होतो. अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे खूप शिकायला मिळतं. तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाहन केलंय. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे स्वच्छतेची आवड निर्माण होते. या उपक्रमातून स्वच्छता किती महत्त्वाची आहे याची जाणीव होते. किनारा स्वच्छ केल्याचे पाहून खूप बरे वाटते.
मयूर पवार, साठय़े महाविद्यालय

जनजागृतीबरोबर स्वच्छताही
आमची स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत आहे. गेली तीन वर्षे आम्ही गणेश विसर्जनानंतर स्वच्छता उपक्रम राबवतो. ‘वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल’ या शाळेच्या एनएसएस युनिटच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही हा सफाई उपक्रम राबवतो. यंदा आमच्या उपक्रमाचे चौथे वर्ष. गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे अवशेष किनाऱ्यावर आलेले असतात. हे खूप त्रासदायक वाटतं. गणपती आपले आराध्य दैवत आहे. त्याचे विसर्जन करून आपण निघून येतो, पण त्या विसर्जनानंतर ती मूर्ती किनाऱ्यावर येते, लोकांच्या पायाखाली येते. हे ठीक वाटते का? असे प्रकार होऊ नयेत यासाठी आाम्ही स्वच्छतेबाबत जनजागृती करून स्वच्छताही करतो. आमच्या टीममध्ये विद्यार्थ्यांसोबतच डॉक्टर, वकील, इंजिनीअर असे वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक सहभागी झालेत. साधारण शंभर-दीडशे लोक आमच्या या उपक्रमात जमा होतात.
डॉ. मयांक सिंग, नवयुवक लोकसेवा प्रतिष्ठान

केवळ विसर्जनाने जबाबदारी संपत नाही
यंदा आमच्या उपक्रमाचे चौथे वर्ष. आम्ही दरवर्षी सात दिवसांच्या आणि अकरा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर दादर, जुहूला स्वच्छता उपक्रम राबवतो. गणेश विसर्जनानंतर बऱ्याच मूर्ती किनाऱ्यावर आलेल्या असतात. किनाऱ्याची सुंदरता कचरामय झालेली दिसते. लोकांना वाटतं गणपती आणला, विसर्जन झाले, आपली जबाबदारी संपते, पण त्यामुळे किती कचरा होतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आम्ही ‘स्वराधार’ ग्रुपतर्फे स्वच्छता उपक्रमात इतरांनीही सहभागी होण्यासाठी आवाहन करतो. मोठय़ा मूर्ती ट्रक्टरने बाहेर खेचून काढल्या जातात, पण लहान मूर्तींबरोबर बरीच वाळूही बाहेर येते. आमचा हेतू हा असतो की, वाळू वाया जाऊ नये. म्हणून यंदा आम्ही जुहू बीचला स्वच्छता उपक्रम राबवतोय. तीन ग्रुप एकत्र मिळून ही स्वच्छता मोहीम राबवतोय. सोमवारी सकाळी हा उपक्रम सुरू करणार आहोत.
हेमलता तिवारी, स्वराधार संस्थापक

आपली प्रतिक्रिया द्या