
या वर्षी आगमनासाठी अगदी जूनअखेरपर्यंत घाम फोडणारा पाऊस एक्झिट घेताना मात्र चांगलाच बरसत असल्याने उद्या रविवारपासून सुरू होणाऱया ‘गरब्या’वर पाणी फिरणार अशी शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांचा सराव आणि नव्या नव्या ‘घागरा-चोली’ची खरेदी करूनही ‘परी हूँ मैं… पण पावसामुळे ‘घरी हूँ मैं’! असेच म्हणण्याची वेळ येणार आहे. यामुळे आयोजकांचेही धाबे दणाणले आहे.
दरवर्षी जूनच्या मध्यावर जोरदार सुरू होणारा पाऊस या वर्षी चांगलाच लांबला. मात्र जुलैच्या सुरुवातीपासून धुवांधार बरसणाऱया पावसाने अद्याप ‘परती’ला जायचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून आयोजित केलेल्या आयोजकांचे धाबे दणाणले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मैदानांमध्ये चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे या ठिकाणी गरबा खेळणार कसा, असा सवाल युवक-युवतींसह गरबाप्रेमींना पडला आहे. त्यामुळे किमान नवरात्रोत्सवात तरी पावसाने आपलाच ‘डान्स’ करू नये अशी प्रार्थना केली जात आहे.
कधी जाईल सांगता येत नाही!
वातावरणातील बदलामुळे पावसाचा नियमितपणाही बदलल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काही दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. यातच पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी हलका तर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पावसाची शक्यता सायंकाळनंतरच असल्यामुळे गरब्याचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर समाचार
‘इतका वेळ थांबलोच आहे, तर दसरा दिवसाळी करूनच जातो’ – आपलाच प्रिय पाऊस
‘प्रिय पाऊस… गरब्याची वाट नको लावूस’!
‘या वर्षी नवरात्रोत्सवात नऊ साडय़ा नव्हे, तर नऊ रंगाचे रेनकोटच घ्यावे लागतील’!



























































