
सामना ऑनलाईन, भोकर
काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भोकर नगरपरिषदेतील कचरा घोटाळा काँग्रेसच्याच एका नगरसेवकाने उघडकीस आणला आहे. यामुळे शहरात काँग्रेसवर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. या नगरसेवकाने केलेल्या याचिकेवर आदेश देताना न्यायालयाने २ अधिकाऱ्यांसह तीन जणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्याचे पोलिसांना आदेश दिले होते, या आदेशानुसार १४ जून रोजी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
काँग्रेसचे नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी भोकरच्या न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये मुद्देवाड यांनी आरोप केला होता की ०८/०९/१७ ते २९/१२/१७ या काळात कचरा उचलण्याचे काम साईबाबा बहुउद्येशीय सेवाभावी संस्थेला देण्यात आलं होतं. या संस्थेकडे कार्यकुशलतेचे प्रमाणपत्रही नव्हते आणि घनकचरा उचलण्यासाठी लागणारे वाहनही नव्हते तरीही त्यांना हे काम देण्यात आलं होतं.
माजी मुख्याधिकारी आशुतोष दिगंबर चिंचाळकर आणि सध्याचे मुख्याधिकारी हरीकल्याण जनार्धन यलगट्टे यांनी हे कंत्राट या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव हरी गायकवाड यांना मिळवून दिलं होतं. या सेभाभावी संस्थेने नगरपरिषदेची वाहने व डंपिंग ग्राऊंड वापरत असल्याचे दाखवलं आणि नगरपरिषदेकडून बिलं वसूल करून घेतली. या कामाचे या संस्थेला दहा लाख अठरा हजार पाचशे रुपये देण्यात आले होते. या गैरप्रकाराबाबत मुद्देवाड यांनी त्यांच्या याचिकेद्वारे आवाज उठवला होता. यावर न्यायालयाने आजी माजी मुख्याधिकारी आणि सेवाभावी संस्थेच्या साहेबराव गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.




























































