
मुंबईकरांच्या समस्या स्थानिक पातळीवर वेळच्या वेळी सोडवल्या जाव्यात यासाठी पालिका आयुक्तांसह सर्व 24 प्रभागांत प्रत्यक्ष भेटी, ‘शून्य कचरा’ मोहिमेसाठी तीन पाळ्यांमध्ये वाहने चालवून कचऱ्याचे संकलन, विकासकामांसाठी राज्याकडे थकीत असलेली रक्कम मिळवून प्रकल्पांची कामे वेगाने करण्यावर भर देणार असल्याचे महत्त्वाकांक्षी व्हिजन नवनियुक्त महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मांडले. यासाठी मुंबईकरांनी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्वात आधी खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्याच्या मटेरियलमध्ये प्लॅस्टिकचा वापर करून मजबूत रस्ते बनवण्यावर भर देण्यात येणार आहे. तर प्लॅस्टिकचे दुष्परिणाम टाळण्यासाठी बंदीची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांमुळे पाण्याची मागणीही वाढणार असल्यामुळे गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा हे नवे जल प्रकल्प लवकरच मार्गी लावणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल आज पालिकेच्या महासभेत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी त्यांचे अभिनंदन केले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी महासभेत उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ गौरवास्पद आणि ऐतिहासिक असल्याचे सांगितले. यावेळी सभागृहात ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आज झालेल्या सुधार समितीमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यात आले. शिवसेनेचे राजू पेडणेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. याला सर्वक्षीयांनी पाठिंबा दिला. दोन्ही सभांमध्ये पेढे वाटून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कुटुंबाला मिळणारी गाडी नाकारली
महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेकडून कुटुंबासाठी मिळणारी गाडी नाकारली आहे. या वाहनासाठी येणारा खर्च त्या महापौर मदतनिधीसाठी देणार आहे. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला देणार असल्याची माहिती त्यांनी आज दिली. मुंबईच्या नवनियुक्त महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनी आज पालिका वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू सोनावणे, सरचिटणीस श्रीरंग सुर्वे यांच्या हस्ते महापौर, उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, नगरसेवक सचिन पडवळ, सिंधू मसुरकर, जनसंपर्क अधिकारी विजय खबाले-पाटील उपस्थित होते.
‘केईएम’ला महापौरांची सरप्राइज व्हिजिट
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केईएम रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाला सरप्राइज व्हिजिट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. बुधवारी एका मांजरीने अर्भकाचे लचके तोडल्याचा प्रकार समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. हे अर्भक बाहेरून कुणीतरी आणून टाकल्याची शक्यता असल्याचे यावेळी महापौरांना रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, उपाययोजना कराव्यात असे सक्त निर्देशही यावेळी महापौरांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. दरम्यान, या प्रकाराची चौकशी सुरू असून हा अहवाल आल्यानंतर संबंधित प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहितीही महापौर पेडणेकर यांनी दिली.
दात्यांना आयकरात शंभर टक्के सवलत
मुख्यमंत्री, पंतप्रधान मदतनिधीला आर्थिक मदत करणाऱ्यांना आयकरात 100 टक्के सवलत मिळते, मात्र महापौर निधीसाठी मदत करणाऱ्या दात्यांना करात फक्त 50 टक्के सकलत मिळते. दात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शंभर टक्के कर सकलत मिळकाकी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे असल्याचेही महापौर पेडणेकर यांनी सांगितले. महापौर निधीसाठी ‘महापौर रजनी’ आयोजित करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

























































