
टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता IPL 2026 ची तयारी सुरू झाली आहे. येत्या 28 मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच IPL मधील क्रिकेटर अमित मिश्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील 35 वर्षीय मॉडेल गरिमा तिवारीने आपला पती आणि आयपीएल क्रिकेटर अमित मिश्रा याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. गरिमाने पतीवर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ, मारहाण आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याचा वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला असून, पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवण्यास नकार दिल्याने पीडितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. गरिमा तिवारीच्या म्हणण्यानुसार, तिची आणि अमित मिश्राची ओळख 2019 मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 26 एप्रिल 2021 रोजी त्यांनी कानपूर क्लबमध्ये लग्न केले. अमित मिश्रा सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर काही काळातच पती आणि सासरच्या मंडळींनी होंडा सिटी कार आणि 10 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत छळ सुरू केल्याचा दावा गरिमाने केला आहे.
आज तक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमित दारूच्या नशेत वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. इतकेच नाही तर तिला अनेक दिवस उपाशी ठेवले जात असे आणि तिच्या मॉडेलिंगमधून मिळणारी कमाईही हिरावून घेतली जात होती. या सततच्या त्रासामुळे गरिमा नैराश्यात गेली असून तिला तिचे करिअर सोडावे लागले. मानसिक तणावातून तिने एकदा फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचाही प्रयत्नही केला होता, ज्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
गरिमाने सांगितले की, तिने पोलीस आयुक्तांसह अनेक ठिकाणी दाद मागितली, मात्र अमितच्या प्रभावामुळे गुन्हा दाखल झाला नाही. तिचे वकील करीम अहमद सिद्दीकी यांनी सांगितले की, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे शेवटी न्यायालयाचा आश्रय घ्यावा लागला. विशेष म्हणजे अमितवर हा तिसरा खटला आहे. यापूर्वी 2025 मध्ये गरिमाने घरगुती हिंसाचार आणि 50 हजार रुपये मासिक भत्ता व 1 कोटी रुपयांच्या भरपाईसाठी देखभाल याचिका दाखल केली आहे.

























































