
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
नेहमीच लोकोपयोगी व रचनात्मक उपक्रमांसाठी पुढे असणारे गाव म्हणून परिचित असलेल्या टोकवाडी येथे डॉ. राजाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम सुरू असतात. याप्रमाणेच टोकवाडी ग्रामपंचायतीने गावातील जि. प. शाळा व अंगणवाडीसाठी गॅस संचाचे वितरण केले आहे.
टोकवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मुलभूत प्रश्न मार्गी लावत अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जातो. या अनुषंगाने ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गावातील शाळेत मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रा. प. मार्फत जि. प. शाळा व अंगणवाडीसाठी गॅस संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे, ग्रा. पं. सदस्य साहेबराव रोडे, भीमराव रोडे, सौ. अलका नामदेव मुंडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
































































