
सामना प्रतिनिधी । वाढवणा
वाढवणा व परिसरातील गावात पाऊस पडल्याने दुषित पाणी व उघड्यावरील पदार्थ व आंबे खाल्ल्याने दोन – तीन दिवसात रुग्णालयात अतिसार झालेल्या रुग्णात वाढ झालेली दिसत येत आहे. यात लहान मुलाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी अतिसार झालेलेच रुग्ण दिसत आहेत.
वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ डॉ.ओमप्रकाश कदम यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता ते म्हणाले, पाऊस झाल्याने व दुषित पाणी, उघड्यावरील पदार्थ खाल्ल्याने उलटी संडास होत आहे. यासाठी पावसाळ्यात अतिसार होऊ नये म्हणुन पाणी उकळुन प्यावे व ताजे अन्नपदार्थ खावेत. उघड्यावरील अन्न व कोणतेही पदार्थ खाऊ नये. घरातील पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोर टाकावे. एक घागर पाण्यात दोन ते चार थेंबाची मात्रा घालावी.
आपल्या घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, सांडपाणी शोषखड्ड्यात घालावे. नाली असेल तर एक दोन दिवसात नाली साफ करून घ्यावी. कारण पाऊस पडल्यामुळे डासांची व्याप्ती वाढते व डास चावल्याने हिवताप व डेंग्यू होण्याची भीती असते. अनेक लहान मुलांना डेंग्यूसारखे रोग होत असतानाचे लक्षणे दिसत आहेत. त्यांच्यातील प्लेटलेट कमी झालेले असतात त्यामुळे वेळेवर डॉक्टरला दाखवले नाहीत, रक्त तपासणी करून घेतली नाहीतर रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात वेळेवर उपचार करणे अगत्याचे आहे. तरी ग्रामस्थांनी त्वरित डॉक्टरशी संपर्क साधावा यामुळे पुढील अनर्थ टाळला जाईल. यावर रामबाण उपाय म्हणजे ताजे अन्न खा पाण्यात मेडिक्लोरचा वापर करा, उघड्यावरील कोणतेही पदार्थ सेवन करू नका व आंबा खाऊ नका, अशी माहिती डॉ.ओमप्रकाश कदम यांनी माहिती दिली.
































































