
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘फिल्टर पाडय़ाचा बच्चन’ अर्थात अभिनेता गौरव मोरे याचे चाळीतून आलिशान टॉवरमध्ये राहण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. गौरवला गुरुवारी म्हाडाच्या पवईतील घराचे ताबापत्र देण्यात आले आहे. यावेळी गौरवचा आनंद गगनात मावेनासा झाला.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या वर्षी 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यात गौरवने कलाकार कोटय़ातून पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज भरला होता. या सोडतीत तो विजेता ठरला होता. बिल्डिंग निर्माणाधीन असल्याने ओसी मिळताच वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर गौरवला आज अखेर म्हाडाच्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत. यावेळी ‘माझा होशील ना’फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे हिलादेखील गोरेगावमधील घराच्या चाव्या देण्यात आल्या. तीदेखील गतवर्षीच्या लॉटरीत विजेती ठरली होती.
माझे बालपण फिल्टर पाडय़ातील चाळीत गेल्यामुळे पवईसोबत माझी नाळ जुळली आहे. इथे माझी हक्काची मित्रमंडळी आहे. इथला निसर्गरम्य परिसर सोडून इतर कुठे राहण्याचा मी विचारदेखील करू शकत नाही. लहानपणी चाळीतल्या खिडकीतून मी येथील आलिशान टॉवरमध्ये राहण्याचे स्वप्न पाहायचो. आज म्हाडाच्या माध्यमातून सी ह्यू असलेल्या आलिशान फ्लॅटचे माझे स्वप्न साकार झाले आहे. स्वप्न पूर्ण होतात फक्त मेहनत करणे सोडू नका. – गौरव मोरे, अभिनेता