
‘आली गवर आली…सोनपावली आली’ असे म्हणत उद्या रविवारी घराघरात गौराईचे मोठय़ा उत्साहात स्वागत होणार आहे. सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते तशी गौराई माहेराला येणार आहे. लाडक्या गौराईच्या पाहुणचारात काही कमी पडू नये यासाठी पूजेचे साहित्य, साडय़ा, मिठाई आणि सजावटीसाठी लागणारी फुले खरेदीसाठी महिलांची मार्केटमध्ये गर्दी झाली होती.
भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौरीचे पूजन करतात म्हणून ही ‘ज्येष्ठा गौरी’ म्हणून ओळखली जाते. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात नवीन धान्य तयार होते म्हणून गौरी ‘धान्य लक्ष्मीच्या’ रूपात घरात प्रवेश करते. म्हणून या सणाला प्राचीन कालापासून विशेष महत्त्व आहे. हा सण अनेक वर्षे परंपरागत पद्धतीने घराघरात साजरा होतो. काही घरी गौरींबरोबरच गणेशमूर्तींचेही विसर्जन केले जाते. काही कुटुंबात पाणवठय़ावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही घरात धान्याच्या राशींवर गौरींचे मुखवटे ठेवून त्याचे पूजन केले जाते. काही घरी गौरींची मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते. तर काही घरी तेरडय़ाची रोपे मुळासकट आणून त्यांची पूजा केली जाते. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरीला पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. काही घरी नैवेद्यात 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वाने असे पदार्थ असतात. 16 दीप प्रज्वलित करून आरती केली जाते.
n या वर्षी रविवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आवाहन करावयाचे आहे. सोमवार 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे पूजन करावयाचे आहे. मंगळवार 2 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 50 मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावयाचे आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली.