आनंदराज आंबेडकरांनंतर गवईंनीही वंचितला कोडय़ात टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंचित बहुजन आघाडीने उशिरा पाठिंबा दिल्याने आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. आता रिपब्लिकन पार्टीच्या राजेंद्र गवई यांनीही अमरावतीच्याच जागेवरून वंचितला कोडय़ात टाकले आहे. गवईंनीही निवडणुकीतून माघार घेत तिथे सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असून वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. आता वंचितकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठिंबा मागितला होता; परंतु आंबेडकर यांनी घराणेशाहीला विरोध केल्याने गवई यांनी त्यांच्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गवई यांनी आपल्या कार्यकर्त्याला वंचितने पाठिंबा द्यावा अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांना केली आहे. आता प्रकाश आंबेडकर त्यावर काय भूमिका घेतात याकडे आंबेडकरी नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.