
सामना ऑनलाईन । मुंबई
गेली दहा वर्षे पुनर्विकासाच्या फेऱ्यात अडकलेले वरळीतील गीता टॉकीज पुन्हा सुरू होणार आहे. बांधून पूर्ण झाल्यानंतरही गेली पाच वर्षे हे टॉकीज सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले नव्हते. पण शिवसेना आणि युवासेनेच्या पाठपुराव्यानंतर 25 जानेवारीपासून हे टॉकीज सुरू होणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित असलेला ‘ठाकरे’ या सिनेमाचा आनंद वरळीकरांना आता येथे घेता येणार आहे.
गीता टॉकीज हा या विभागातील सर्वसामान्यांना परवडणारा मनोरंजनाचा मार्ग होता. बिल्डरने टॉकीजचा पुनर्विकास केला. त्यावर चार मजली इमारत बांधून त्यातील व्यावसायिक गाळय़ांची विक्रीही केली, पण बिल्डरने टॉकीज सर्वसामान्यांसाठी सुरू केले नाही. याबाबत शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर आणि युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी राज्य सरकार तसेच महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला.
शिवसेना आणि युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे हे सिनेमागृह आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला वरळीकरांना पुन्हा मनोरंजनाची मेजवानी मिळणार असल्याची माहिती युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.




























































