
ओडिशा येथील पुरी येथे प्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार 46 वर्षांनंतर उघडण्यात आले. रविवारी 14 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा खजिना उघडण्यात आला. पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडारात सोने, चांदी, हिरे, माणिक यांसह अनेक पुरातन दागदागिने असून याची मोजदाद केली जाईल. दागिन्यांची संख्या, दर्जा, वजन, फोटो इत्यादींचा संपूर्ण डिजिटल कॅटलॉगही तयार केला जाईल. जेणेकरून त्याचा भविष्यातील संदर्भ दस्तऐवज म्हणून वापर करता येईल.
भांडारगृहामध्ये ओडिशा सरकारचे प्रतिनिधी पुरातत्व विभागाचे अधिकारी, श्री गणपती महाराजच्या प्रतिनिधींसह एकूण 11 लोक उपस्थित होते. या सर्वांच्या समक्ष दागिन्यांची मोजदाद आणि डिजिटल लिस्टिंग होणार आहे.
मोजदाद आणि डिजिटल लिस्टिंग केल्यानंतर हा सर्व खजिना लाकडी संदुकामध्ये ठेवला जाईल. त्यासाठी भल्यामोठय़ा सहा संदुका बनवून घेण्यात आल्या असून त्या रविवारी सकाळी जगन्नाथ मंदिरात पोहोचल्या.
पुरीच्या खजिन्यात काय…
n मंदिराच्या आत एक रत्न भांडार आहे जे दोन भागांत विभागले गेले आहे. त्याचा बाहेरचा भाग खुला आहे, पण आतला भाग गूढच आहे. असे म्हटले जाते की, रत्न भांडारमध्ये भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे मौल्यवान दागिने आहेत, जे पूर्वीच्या काळात राजांनी दान केले होते. हे दागिने भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेसारख्या विशेष प्रसंगी परमेश्वराला सजवण्यासाठी बाहेर काढले जातात. मात्र आतील भांडार गेल्या 46 वर्षांपासून उघडण्यात आलेले नाही.
n 13 मे ते 13 जुलैदरम्यान 1978 मध्ये शेवटच्या वेळी रत्न भांडार उघडण्यात आले होते, तेव्हा त्यात उपस्थित असलेल्या वस्तूंची यादी करण्यात आली होती. त्यानुसार अंतर्गत साठय़ामध्ये सुमारे 128 किलो सोने आणि 222 किलो चांदी असल्याचे सांगण्यात आले
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर 12 व्या शतकातील आहे. 1978 साली मंदिरातील रत्न भांडार उघडण्यात आले होते. तेव्हापासून रत्न भांडार बंद आहे. ओडिशा उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर ते आता उघडले जाणार आहे.
या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने बनवलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती बिश्वनाथ रथ यांनी सांगितले की, रत्न भांडार उघडण्याआधी त्याचे मालक देवी बिमला, देवी लक्ष्मी यांची मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर देखभालकर्ते भगवान लोकनाथ यांचीही मंजुरी घेण्यात आली. दुपारी 12 च्या सुमारास सर्व सदस्यांनी पारंपरिक पोशाखात मंदिरात प्रवेश केला आणि आज्ञा विधी पूर्ण केला. त्यानंतर रत्न भांडाराचा दरवाजा उघडला.
नागदेवता रत्न भांडाराचे रक्षण करतात असा समज आहे. रत्न भांडारातून फूत्कार सोडल्याचे आवाज येतात. त्यामुळे रत्न भांडार उघडताना सर्पमित्रांनाही पाचारण करण्यात आले. मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.