
संतोष भोसले । गेवराई
मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावाचा रहिवासी संतोष गर्जे. वयाच्या एकोणीसाव्या वर्षांपासून तो अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. 2004 सालापासून तर तो अनाथालयच चालवत आहे. त्याचा ‘सहारा’ अनाथालय गेवराई तालुक्याच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तीन एकरांच्या जागेवर उभा आहे. अनाथालयात पंच्याऐंशी मुले-मुली आहेत. संतोष आणि प्रीती हे तिशीचे दाम्पत्य त्या मुलांचा सांभाळ आई-वडिलांच्या नात्याने करत आहेत. त्यांचे बारा सहकारी या समाजकार्यात सोबतीला असतात.
संतोषने हलाखीची परिस्थिती लहानपणापासून घरी अनुभवली आहे. आई-वडील ऊसतोडणीच्या कामासाठी सहा-सहा महिने चार जिल्हेपार असायचे. संतोष त्याच्या तीन बहिणींबरोबर घरी राहायचा. घर सांभाळायचा. ती भावंडे त्यांचा रोजचा खर्च गावातच लहान-मोठी कामे करून, मजुरी करत निभावून नेत. पालकांची कमाई ही सावकाराची आणि इतर देणी चुकवण्यातच बऱ्याचदा संपायची. संतोष सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचा. तो थोडा मोठा झाल्यावर, त्याची कसरत शेतात काम आणि महाविद्यालयात शिक्षण अशी चालायची. संतोषने आष्टी महाविद्यालयातून बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. तेवढ्यात त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. तिला पहिली मुलगी झाली, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. बहीण दुसऱ्या वेळी सात महिन्यांची गर्भार असताना तिचा मृत्यू बाळंतपणात झाला. मुलीचे जाणे संतोषच्या वडीलांच्या जिव्हारी लागले आणि ते घरदार सोडून देवधर्म करण्यासाठी न सांगता कायमचे निघून गेले. ते कमी म्हणून की काय संतोषच्या मेव्हण्याने लगेच दुसरे लग्न केले. संतोषची साडेतीन वर्षांची भाची अनाथ झाली.
वडिलांच्या परागंदा होण्याने नातेवाईकांनीही कुटुंबाकडे पाठ फिरवली. डगमगून जाण्यात अर्थ नाही हे संतोषने जाणले. तो संभाजीनगरला गेला. त्याने तेथे पाच हजारांच्या पगारावर काम सुरू केले. मात्र छोट्या भाचीचा प्रश्न त्याच्या डोक्यात कायम होता. संतोषच्या मनावर सर्व घटनांचा खोलवर परिणाम झाला होता. भाचीसारख्या इतर अनाथ मुलांसाठी काहीतरी करावे, त्यांना हक्काचे घर मिळवून द्यावे या विचाराने झपाटले. या अनाथासांठी संतोषने स्वत:चा पैसा उभा करायचा म्हणून तालुका गाठला.
संतोषने नीतिनियम – त्यातून उद्भवणाऱ्या विविध समस्या यांच्या गदारोळात अडकलेल्या मुलांना जेवण आणि आसरा देण्याची जबाबदारी उचलली. एका शेतकऱ्याने त्याच्या शेताचा काही भाग मुलांसाठी निवारा उभारण्याकरता दिला. संतोषने एका व्यापाऱ्याला गाठून पंचाहत्तर पत्रे उधारीवर मिळवले. त्याला उधारी हा सोपा मार्ग निधीसंकलनाच्या मोहिमेत मिळाला. त्याने खिळे, पट्टी, लाकडी बांबू हे साहित्यही उधारीवर आणले. निवारा तयार झाला, पण मुले कशी येणार? त्याचे वय वर्षें एकोणीस. कोणीही संतोषवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. संतोष वर्णन करतो, “पायात चप्पल नाही, अंगात नीटसे कपडे नाहीत आणि मी अनाथ मुलांना सांभाळीन असे म्हणत होतो. माझ्यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार? तरीही गेवराई तालुक्यातील वाडीवस्ती तांडा, केकतपांगरी, पोईतांडा, अंबूनाईकतांडा आणि ताकडगाव या गावांतून, वेगवेगळी कौटुंबिक परिस्थिती असणारी सात मुले मिळाली आणि एका प्रवासाला सुरुवात झाली! लेकरे आली होती. खाण्यासाठी जमून ठेवलेला दाणागोटा हा हा म्हणता संपला. आता काय? मग घरोघरी, दारोदारी, “गावोगावी जेथे जेथे जमेल तेथे तेथे डाळदाणा, कपडालत्ता, वह्यापुस्तके पसाखोंगा घेऊन यायचे अन् लेकरांना घालायचे असा कुत्तरओढीचा दिनक्रम चालू झाला. जवळ पैसा नाही, ज्ञान नाही, सर्वदूर अज्ञान… कल्पनाच न केलेली बरी…”
संतोषने गावोगावच्या पायपिटीसाठी मोफत प्रवास करण्याचे नवे तंत्र त्या काळात विकसित केले. तो मोटारसायकलवर पुढील गावी जाणाऱ्या माणसाला, ‘सोडा की जरा पुढच्या गावापर्यंत’ असे म्हणायचा. संतोष मोटारसायकलवाला जाईल त्या गावाला जायचा, ओळखी काढायचा, अनाथ मुले आणि मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. हळुहळू यश मिळत गेले.
संतोषने मुलांना दर्जेदार साहित्यच देण्याचे ठरवल्याने त्याला अधिक खटपट करणे क्रमप्राप्त ठरले. त्याचा आग्रह त्याला स्वतःला जे मिळाले नाही ते त्या मुलांना मिळायला हवे असा असतो. त्याने लहान मुलांना गणवेश, टाय, बूट असे सारे काही देण्यासाठी आटापिटा केला आहे. त्याला नव्या उधाऱ्या, पैसे वेळेवर देता न आल्यामुळे तोंड फिरवणे, व्यापाऱ्यांची बोलणी खाणे हे सारे सहन करावे लागले. संतोष सांगतो, “काही वेळा, परिस्थितीला पर्याय नसतो. अनाथालयाचा कारभार समाजाच्या भरवशावरच चालत आला आहे. संतोषला मुलांसह राहताना शेतातील पत्र्याच्या घरात अनेक अनुभवांना सामोरे जावे लागले. ना वीज, ना पाणी. एकदा, एका मुलाला विंचू चावला. त्याला दवाखान्यात भरती करावे लागले. एका रात्रीचे बिल बावीसशे रुपये झाले.” संतोषच्या खिशात एकशे अडतीस रुपये होते. त्याने एवढे पैसे आणायचे कोठून? कोण देईल? त्याने एका शेतकऱ्याचे घर गाठले आणि सात रुपये टक्क्याने व्याजाचे पैसे आणले.
मग मात्र संतोषने गावात राहण्याचे, तेथे भाड्याने जागा घेण्याचे ठरवले. चार खोल्यांची जागा महिना दीड हजार रुपये भाड्याने मिळाली. संतोष सांगतो, भाडे दर महिन्याला वेळेवर देणे शक्य होईल असे नाही. मालक घालून-पाडून बोलायचे. गेवराई शहरातच शिवाजीनगर भागात पुन्हा जागा बघितली. तेथे त्यांनी सहा वर्षें काढली. पैशांची नड असेच. अखेर, मालकाने एके दिवशी, रात्री सामानासह सर्वांना घराबाहेर काढले! ती रात्र त्यांनी सगळ्यांनी मंदिरात काढली.
संतोषने अमरावतीचे डॉक्टर अविनाश सावजी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांचे मुंबईतील मित्र रमेशभाई कचोलिया यांना परिस्थिती सांगितली आणि त्यांनी संतोषच्या बँक खात्यात एक लाख रुपयांची मदत पाठवली. कमालीच्या अवघड वळणावर मिळालेला तो मदतीचा हात संतोषला हुरूप देण्यास पुरेसा ठरला! संभाजीनगर येथील तीन उद्योजकांनी तीन एकर जागा गेवराईजवळ घेऊन दिली. संभाजीनगर येथीलच रणजीत ककड यांनी तीन हजार चौरस फुटांची रेडिमेड बिल्डिंग बांधून दिली. मग डॉ.विकास आमटे यांनी ‘स्वरानंदवन’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून इमारतीच्या अंतर्गत बांधकामासाठी अधिक मदत केली. त्यांनी त्यासाठी ‘सहारा’ अनाथालयाच्या मदतीकरता म्हणून संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्या निधीतून ‘सहारा’अनाथालयाची इमारत पूर्ण स्वरूपात उभी राहिली.
संतोषने ‘आई जनहित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’ या नावाने संस्थेची नोंदणी 2007 साली केली. त्यांनी 2004 पासून सरकारी मदत मिळवण्यासाठी खटपट चालवली असून, अनुदानाचा प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात पडून आहे. संतोषला ‘सहारा’ अनाथालयाचा वाढता पसारा सांभाळता सांभाळता अनेकदा खचून जाण्यास होते. मात्र तशा वेळी त्या मुलांपैकीच अनेकांचे हात त्याचे डोळे पुसण्यास पुढे येतात.
‘सहारा’ अनाथालयात मुलांच्या अंगी कृतिशीलता बाणवली जाते. मुलेच अनाथालयातील बरीचशी कामे सांभाळतात. संतोषची पत्नी प्रीती गेली सहा वर्षें त्याला साथ देत आहे. संतोषची ओळख यवतमाळमधील प्रीती थूल या तरुणीशी झाली. प्रीती सधन घरातील आहे. तिने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. संतोषला त्याच्या कामात तिच्या शिक्षणाचाही उपयोग होतो. त्या दोघांची ओळख आणि लग्न हा प्रवासही काही सहजासहजी घडला नाही. प्रीतीचे वडील ‘महावितरण’मध्ये अधिकारी आहेत, तर भाऊ बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीला, तिची बहीण डॉक्टर आहे. आई-वडिलांना प्रीती समजावण्याच्या भानगडीत न पडता ‘सहारा अनाथालय’ दाखवण्यास घेऊन गेली. त्यांना अनेक मुलांचे पितृत्व निभावणारा ‘हा मुलगा’ त्यांच्या मुलीचा चांगला सांभाळ करील हे पटले आणि त्यांचा होकार लग्नाला मिळाला. संतोष आणि प्रीती यांचा संसार पहिल्या दिवसापासून असा मुला-बाळांनी भरलेला आहे. संतोष सांगतो, “माझ्या तीन मुलांची लग्न झाली आहेत, मला सुना-नातवंडे असा परिवार आहे.” तो तिशीत आजोबा आहे! असे आवर्जून सांगतो. गमतीचा भाग अलाहिदा, संतोषची संवेदनशीलता विलक्षण आहे. तो म्हणतो, “कायद्यानुसार वयाच्या अठरा वर्षांपर्यंत मुलांना अनाथालयात ठेवता येते. पण समाजातील कुटुंबांमध्ये थोडेच असे चित्र दिसते? आयुष्यभर सगळे एकत्रच राहतात की! त्यामुळे मला माझी मुले-बाळे जोडलेलीच आहेत. ती माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार, काम करणार!”
संतोष आणि प्रीती एका बालग्रामची संकल्पना यशस्वीपणे उभारण्यासाठी झटत असतात. संतोष म्हणतो, “डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या शब्दांत सांगायचे तर सामाजिक उद्योजकता महत्त्वाची आहे. त्यांचे ते शब्द माझ्या डोक्यात ठाण मांडून आहेत आणि त्यासाठी मी आणि माझे सहकारी प्रयत्नशील राहणार आहोत. आम्ही संस्था स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहोत.”
१३ वर्षात 189 मुलींचा सांभाळ केला, काही मुलांची लग्न झाली असून त्यांच्या बायकांसह संस्थेतच काम करत आहेत. काही मुले वेगवेगळ्या खाजगी कंपनीमध्ये पुणे, नाशिक, संभाजीनगर अशा ठिकाणी काम करत. बारावीच्या पुढची मुले इंजिनिअरिंग, हॉटेल मँनेजमेंट, फँशन डिझायनींग तर काही स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करत आहेत.
आश्रमात अशी आहे व्यवस्था
मुलांना त्यांच्या हक्काचं बालपण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एका मोठ्या घरासारखे वातावरण आहे. सर्वांसाठी एकच स्वयंपाक घर असून मुला मुलींची वेगळी निवास व्यवस्था आहे. हा सगळा गाडा लोक सहभागातून चालतो त्यामुळे त्यांच्या दातृत्वाचा आदर करून सर्व बाबींचा विनिमय योग्य व्हावा ही जबाबदारी सर्वचजण पार पाडतात.
साध्य काय झाले
स्वत:चं आयुष्यात आलेली संकटे या सगळ्या गोष्टीवर मात करत त्याने या अनाथ मुलांना मायेची ऊब दिली त्यामुळ्च 189 लेकरांना हक्काचं घरं मिळालं, नातीगोती, शिक्षण, आरोग्य, डोक्यावर छप्पर, सुरक्षितता, उज्वल भविष्य आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांने १३ वर्षात 189 मुलीचा सांभाळ केला. मुलांना त्यांच्या हक्काचं बालपण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एका मोठ्या घरा सारखे वातावरण आहे. सर्वांसाठी एकच स्वयंपाक घर असून मुला मुलींची वेगळी निवास व्यवस्था आहे. हा सगळा गाडा लोक सहभागातून चालतो त्यामुळे त्यांच्या दातृत्वाचा आदर करून सर्व बाबींचा विनिमय योग्य व्हावा ही जबाबदारी सर्वचजण पार पाडतात.






























































