
सामना प्रतिनिधी । औसा
शहरातील प्रभाग क्र. ६ मोमीन गल्ली भागात मागील अनेक दिवसापासून नळाला पाणी येत नसल्याने संतप्त महीला व नागरिकांनी पालिकेवर घागरमोर्चा काढून मुख्याधिकारी गैरहजर असल्याने रिकाम्या खुर्चीला हार घालून नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदविला.
मोमीन गल्ली भागात ३ इंची पाईपलाईन असून ही पाईपलाईन मुख्य लाईनला जोडली असून ठिकठिकाणी व्हॉलव्ह बसविल्यामुळे केवळ गळतीचे दूषित पाणी नळाद्वारे आल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तात्पुरती पीव्हीसी पाईपलाईन चाचणी न करताच बुजविल्याने पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सदर भागातील पाणी पुरवठा व्यवस्था तात्काळ सुरळीत करावा या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी औसा यांना देण्यासाठी नागरिक गेले असता कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने त्यांच्या खुर्चीस हार घातला. भ्रमणध्वनीवर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचा संपर्क होऊ शकला नाही. मोमीन गल्लीतील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. लोकनायक संघटना व समाजवादी पार्टीनेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
या निवेदनावर समाजवादी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा पटेल, लोकनायक संघटनेचे दत्ता मसलगे, बब्बु शेख, युवराज कसबे, सोहेल शेख, अमोल थोरात, अभिजती कठारे, ज्ञानेश्वर जाधव, आसिफ बागवान, तसेच नदीम सय्यद, जिलानी करपुरे, महेबुब करपुडे, अनवर करपुडे, असिफ करपुडे, गौसीयाबी मणियारी, हमजाबी करपुडे, शाहीन बराटे, हजराबी करपुडे यांच्या सह्या आहेत.


































































