मुरबाडमध्ये घरकुल योजनेचे लाभ धनदांडग्यांनी लाटले; गरजू लाभार्थ्यांची घरासाठी वणवण

मुरबाडजवळील देवराळवाडीवरील भरत भस्मा याचे कुडाचे घर अतिवृष्टीत कोसळले. घरातील अख्खं कुटुंब गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यातील घरकुल योजनेचा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. घरकुल योजनेचे लाभ धनदांडग्यांनी लाटल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरासाठी वणवण करावी लागत आहे. आदिवासी गरीब भस्मा कुटुंबाला वेळीच घरकुलाचा लाभ मिळाला असता तर हा अनर्थ टळला असता अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.

भस्मा कुटुंबाचे कुडाचे घर अतिवृष्टीने कोसळल्यानंतर बोगस घरकुल योजनेच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील पोटगावपासून पाटगावपर्यंत, शेलगाव-शाईपासून सावर्ण- मेर्दी माळशेज घाट माथ्यापर्यंत असलेल्या तालुक्यातील सर्व बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर यांनी केली आहे. घरकुल यादीत ज्यांना खरोखरच घराची गरज आहे अशा लाभार्थ्यांना वंचित ठेवले गेले आहे. तर बोगस सर्व्हे करून धनदांडग्यांची घरकुलाची खिरापत वाटली जात आहे. मुळात कुडाची घरे, भूमिहीन, विधवा महिला, बेघर नागरिकांसाठी घरकुल योजना आहे. मात्र काही ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतःच्या कुटुंबीयांसह नातेवाईक यांनाही घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. त्यामुळे योजनेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे.

बंगला, कार तरीही गरीब
या योजनेचा लाभ घेणाऱ्या 70 टक्के लाभार्थ्यांकडे बंगले, पक्की घरे, घरात लाखो रुपयाचे फर्निचर, दुचाकी, चारचाकी वाहने, जमीनजुमला आहे. तरीही अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन त्यांना घरकुल मंजूर केले आहे. यामध्ये ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समितीचे अधिकारी सहभागी आहेत. या सर्वांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पीडित भस्मा कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ का मिळाला नाही याची चौकशी केली जाईल. शिवाय बोगस लाभार्थ्यांचीही झाडाझडती घेतली जाईल.
– अभिजित देशमुख,
तहसीलदार