
घाटकोपरमध्ये गुरुवारी दुपारी नाल्यात पडलेल्या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा स्थानिकांना सापडला. हुसेन अब्दुल अहमद शेख (५) असे या या मुलाचे नाव आहे.घाटकोपर पंत नगर पोलीस चौकी, सावित्रीबाई फुले नगर येथील गल्ली नंबर ६ येथील नाल्यात हा मुलगा गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक पडला. घटनेनंतर कुटुंबीय, स्थानिक रहिवासी आणि पालिकेच्या अग्निशमन दलाने गुरुवारी सायंकाळपर्यंत शोधकार्य केले. छोट्या बोटी, जाळ्या आणि जेसीबीच्या सहाय्याने मुलाचा शोध घेण्यात आला. मात्र मुलाचा शोध लागला नाही. शुक्रवारी रात्री उशिरा मुलाचा मृतदेह स्थानिकांना सापडला. मुलगा सापडल्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुलगा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत असल्याचे जाहीर केले.





























































