घाटकोपर पूर्व- पश्चिम भागाला जोडणारा पूल बंद

सामना ऑनलाईन । मुंबई

अंधेरी स्थानकाजवळी गोखले पूलाचा काही भाग रेल्वेमार्गावर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका व रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबईतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शुक्रवारपासून सुरू केले आहे. या ऑडिटदरम्यान घाटकोपरमधील एक पूल धोकादायक असल्याचे समोर आल्याने या पूलावरील वाहतूक काल रात्रीपासून बंद करण्यात आली. घाटकोपरच्या पूर्व- पश्चिम भागाला जोडणारा हा पूल खालच्या बाजूने झुकल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने या पूलावरील वाहतूक थांबविण्यात आली. वाहतूक पोलीस, पालिका व रेल्वे अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा पादचारी मार्ग रेल्वे रुळांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पालिका अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबईतील ४७७ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे.