
घाटकोपरमध्ये 13 मे 2024 रोजी महाकाय हार्ंडग कोसळून झालेल्या दुर्घटनेला आयपीएस अधिकारी कैसर खालिद, पालिकेचे निवृत्त लायसन्स इन्स्पेक्टर सुनील दळवी तसेच होर्डिंग कंपनीचे मालक भावेश भिंडे जबाबदार असल्याचा ठपका माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या चौकशी समितीने ठेवला आहे. या सर्वांनी अवैध गट बनवून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले. या संपूर्ण प्रकरणाची अंतिम जबाबदारी खालिद यांची असून त्यामुळेच होर्डिंग कोसळून 17 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला. 854 पानी अहवालात तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यावरही ठपका ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल मांडण्यात आला. त्या आधारे सरकारने दोघांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
- आयुक्त कैसर खालिद यांनी कोणतेही नवीन टेंडर न काढता किंवा पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता होर्डिंग आकारात वाढ केली आणि तीन नवीन हार्ंडग उभारण्याचा अधिकार गैरपद्धतीने बजावला. हे सर्व कृत्य मुंबई महापालिका आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या नियमांच्या विरोधात झाले.
- रवींद्र शिसवे हे अधिक जागरूक आणि सक्रिय असते तर ते एगो मिडियाला अधिक बांधकाम करण्यापासून थांबवण्यास किंवा अनधिकृत होर्डिंग संरचना उद्ध्वस्त करण्यास प्रवृत्त करू शकले असते. त्यामुळे होर्डिंगची पडझड रोखली जाऊ शकली असती आणि अनेक प्राण वाचवले गेले असते, असे अहवालात नमूद केले आहे.
- व्हीजेटीआय या संस्थेचा 12 जून 2024चा अहवाल आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाचा अहवाल स्पष्ट दर्शवतो की, विहित मानकांचे पालन न केल्यामुळे दुर्घटना घडली. योग्य पाया दिला असता तर संरचना कोसळली नसती. या घटनेचा अपघात व त्यातील मृत्यू टाळता आले असते, असे अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.




























































