जान्हवी मराठे, सागर कुंभार यांना पोलीस कोठडी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने अटक केलेल्या जान्हवी मराठे आणि कंत्राटदार सागर कुंभार यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

13 मे रोजी घाटकोपर पूर्वेकडील पेट्रोल पंपवर बेकायदेशीरपणे उभारलेले भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत 17 नागरिकांचा नाहक बळी गेला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. ही दुर्घटना घडल्यानंतर ईगो लिमिटेड कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे आणि पंत्राटदार सागर पुंभार हे दोघेही आपले मोबाईल बंद करून पसार झाले होते. दरम्यान, जान्हवीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक दोघांचा कसून शोध घेत होते. अखेर दोघेही गोव्यातील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन दोघांना शनिवारी पकडून मुंबईत आणले. आज दोघांनाही सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले असता दोघांनाही 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.